पावसाळ्यात सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

प्रतिनिधी, मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा येत्या दोन महिन्यांत संपणार आहे. कांदिवलीपर्यंत जूनअखेर सहावी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. यामुळे पावसाळ्यातील सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार आहे.गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचा ४.७ किलोमीटरचा पहिला टप्पा रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या अंतर्गत मालाड, कांदिवली रेल्वे स्थानकात मार्गिका उभारण्यात येणार आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान (३ किमी) भू-संपादन योग्य वेळेत झाल्यास व अन्य अडचणी न उद्भवल्यास नोव्हेंबर २०२४ अखेर अंतिम टप्पा खुला करण्याचे नियोजन आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. कांदिवलीदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी एकूण १२ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी आठ रेल्वे पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४ पुलांचे काम विविध टप्प्यांत सुरू आहे. त्याचबरोबर मालाड आणि कांदिवली स्थानकात इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग इमारतींसह तिकीट आरक्षण कार्यालय उभारण्यात येणार आहे. मालाड स्थानकातील तिकीट कार्यालयाने काम पूर्ण झाले आहे.
शिवसेना संपविण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची टीका
सहाव्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणेचे काम ७० टक्के आणि ओव्हर हेड वायरसंबंधित काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. खार रोड ते गोरेगावपर्यंतची सहावी मार्गिका नोव्हेंबर २०२३ मध्ये खुली करण्यात आली आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान दोन धीम्या आणि दोन जलद मार्गिका आहेत. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसची वाहतूक पाचव्या मार्गिकेवरून होते. एकाच मार्गिकेमुळे मेल-एक्स्प्रेससाठी अनेकदा लोकलच्या जलद मार्गिकेचा वापर होतो. यामुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ३० किमी लांबीची सहाव्या मार्गिका उभारणीचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

एमयूटीपी २ प्रकल्प संचात मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. वापरात असलेल्या रेल्वे मार्गिकांलगत असलेल्या जागेच्या अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला. या सहाव्या मार्गिकेसाठी ९१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या बोरिवली परिसरातील अडचणी आल्यामुळे आधी कांदिवलीपर्यंत त्यानंतर बोरिवलीपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

प्रकल्पसंचाचा खर्च आठ हजार कोटींवर

सहाव्या मार्गिकेचा हा प्रकल्प मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) दोनमधील सर्वाधिक विलंबाचा प्रकल्प मानला जातो. प्रकल्प संचात गोरेगावपर्यंत हार्बर विस्तार, परळ ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका अशा प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्प संचाचा मूळ खर्च ५,३०० कोटी होता. मात्र अनधिकृत झोपड्या, रुळांलगतच्या इमारतींमुळे भूसंपादन रखडल्याने प्रकल्प खर्च ८,०८७ कोटींवर पोहोचला आहे.