सध्या मुंबईतील २४ पैकी काही वॉर्डमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते. याशिवाय मुंबईत महापालिकेच्या १७ विभागांत ३२ ठिकाणी सार्वजनिक बहुमजली आणि भूमिगत पार्किंग उभारण्यात आले आहे. अन्य ठिकाणी कामेही सुरू आहेत. तर ६२ ठिकाणी रस्त्यांवर वाहनतळ आहे. तर मुंबईतील काही भागात पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्रही आहे.
अॅपच्या सॉफ्टवेअर कामासाठी गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा निविदा काढली आहे. जानेवारी २०२४ नंतर हार्डवेअर कामांसाठी निविदा काढली असता त्याकडेही कंत्राटदारांनी पाठ फिरवली. हार्डवेअर कामांसाठी दोन वेळा काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा काढली जाणार आहे.
विधानपरिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने या कामांसाठी पुन्हा निविदा काढलेली नाही. जुलै महिन्यात ही निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत किंवा त्यानंतरच पार्किंग मोबाईल ॲप सेवा मुंबईकरांच्या सेवेत येऊ शकेल, असे बोलले जात आहे.
उत्पन्नात भर
वाहनांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पार्किंगची उपलब्धता मात्र नाही. नेमके पार्किंग कुठे करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. यावर उपाय म्हणून वाहनचालकांना मोबाइलवर पार्किंगच्या जागेची उपलब्धता समजेल, अशी ॲप सेवा विकसित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
सरकारी, खासगी कार्यालयांच्या जागेबरोबरच निवासी सोसायट्यांच्या जागेतही वाहनांना पार्किंग उपलब्ध आहे का ते या ॲपद्वारे वाहनचालकांना समजणार आहे. त्यानुसार जवळच उपलब्ध असलेल्या जागेत चालक वाहन पार्किंग करू शकणार आहे. त्याचे दरही निश्चित केले जाणार आहेत. यातून महापालिकेला आणि सोसायट्यांनाही उत्पन्न मिळणार आहे.