रुपेश गायकवाड (राहणार पोलादपूर, जिल्हा रायगड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून भोर एसटी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
रुपेश हा एसटी बसच्या समोरुन डाव्या बाजूने पलीकडे उजव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी एसटी बसला चिकटून चालत असल्याने ते चालकाच्या लक्षात आलं नसावं, असं सीसीटीव्हीतून प्रथमदर्शनी वाटतं. त्यामुळे चालकाने अचानक बस सुरु करत पुढे घेतली. यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्याने रुपेश गायकवाड याचा मृत्यू झाला.
रुपेशच्या पायाला दुखापत झालेली होती. त्यामुळे तो लंगडत चालत होता. त्यातच तो बसला धरुन चालत असताना अचानक बस सुरु झाल्याने बसच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. लंगडत असल्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नसल्याचं बोललं जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह भोर उपविभागीय हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. पुढील तपास भोर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरही अपघात
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही दोन दिवसांपूर्वी असाच एक अपघात घडला. स्वतःचा अपघातातून बचाव करताना कैलास मढवे नावाचा तरुण वैतरणा नदी पात्रात पडून वाहून गेल्याची घटना घडली. तो एकवीरा देवीचे दर्शन घेऊन मित्रांसह पायी परत येत होता. यावेळी भरधाव वेगातील ट्रकची धडक चुकवण्याच्या नादात तो नदीत पडल्याने वाहून गेला. नदीपात्रात वाहून गेलेल्या कैलासचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली, परंतु ती व्यर्थ ठरली.