राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात दिनांक ८ एप्रिल २०२४पासून (लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून) ते आजपर्यंतच्या सभांचे ठिकाण तारखेसह देण्यात आले आहे.
‘लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज महाराष्ट्राच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटी शंभर सभा पूर्ण केल्या. या शंभर सभा आदरणीय पवार साहेबांचे अस्सल नेतृत्व, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि त्यांच्या प्रती असलेल्या निष्ठेला समर्पित. कितीही संकटे आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार अभेद्य, अविचल राहून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करेल.’ अशी भावना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
फडणवीस यांचंही शतक
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनीही १०० सभांचा आकडा पूर्ण केला आहे. वेंद्र फडणवीस यांच्या सभांना भाजप नेत्यांकडून मोठी मागणी होती. पहिल्या टप्प्याची घोषणा होताच फडणवीसांनी दौरा घोषित केला. राज्यातील आज पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे.
प्रचारतोफा थंडावल्या
मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर आज, शनिवारी सायंकाळी शमली असून, प्रचाराच्या तोफा सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता, फुटलेले पक्ष यांसारख्या अनेक कारणांमुळे राज्यासह मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे.