पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान, तर या राज्यात सर्वात कमी मतदान, जाणून घ्या एकूण टक्केवारी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर संपले. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह १० राज्यांतील लोकसभेच्या एकूण ९६ जागांवर मतदान झाले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या चार टप्प्यांत आतापर्यंत ३७९ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सध्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.०१ टक्के मतदान झाले आहे.
Loksabha Election: मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
मतदानाच्या या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ जागांवर निवडणूक झाली. चौथ्या टप्प्यातील मतदानात बिहारच्या ५, जम्मू-काश्मीरच्या १, झारखंडच्या ४ आणि मध्य प्रदेशच्या ८ जागांचाही समावेश आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील ११, ओडिशाच्या ४, तेलंगणाच्या १७, उत्तर प्रदेशच्या १३ आणि पश्चिम बंगालच्या ८ लोकसभेच्या जागांवरही मतदान झाले. चौथ्या टप्प्यात १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटींहून अधिक मतदार होते. त्यापैकी ८.९७ कोटी पुरुष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.०२ टक्के मतदारांनी मतदान केले. पश्चिम बंगालमधील कृष्णनगरमधून तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे ३६.८८ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील ११ जागांसाठी सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. सायंकाळी ५ वाजताच्या आकडेवारीनुसार या ११ जागांवर ५२.९३ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभेच्या उर्वरित १३ जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.
पश्चिम बंगाल – ७६.०२%
मध्य प्रदेश – ६९.११%
झारखंड – ६४.३०%
तेलंगाना – ६१.५६%
आंध्र प्रदेश – ६८.२०%
उत्तर प्रदेश – ५८.०२%
ओडिशा – ६४.२३०%
बिहार – ५५.९२%
महाराष्ट्र – ५२.९३%
जम्मू-कश्मीर – ३६.८८%