पवईत झोपडपट्टी तोडक कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; पाच ते सात पोलिस जखमी

मुंबई : पवईला उच्चभ्रू परिसर म्हणून पाहिला जातो पण पवईतील भीम नगरमध्ये बीएमसी पथकावर आणि पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली आहे. याघटनेत पाच ते सात पोलिस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बीएमसीने झोपडपट्टीवर तोडक कारवाई केली त्यावेळी संतप्त जमावाने थेट पोलिसांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तसेच दगडफेक केल्याची घटना घडली.

नेमके प्रकरण काय?

काही दिवसांपुर्वी आम्ही मतदार होतो तेव्हा आम्ही आणि आमची घर अधिकृत होती पण आता आम्ही आणि आमची घर अनधिकृत का? असा सवाल स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे. पवईतील भीमनगर परिसरात साधारण दोनशे ते तीनशे झोपड्या वसलेल्या आहेत. साधारण मे ३० ला बीएमसीने नोटीस पाठवून घरे रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. आज तोडक कारवाईसाठी बीएमसी आणि पोलिस पथक आले त्यामुळे संतप्त जमावाने घर वाचवण्यासाठी टोकाची पावले उचलली असे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. नागरिकांचा आक्रोश पाहून बीएमसीने ही कारवाई सध्या तात्काळ थांबवली आहे. तसेच पोलिसांच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याघटनेत नागरिकांना सुद्धा दुखापत झाल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सदर जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याची माहिती मिळते परंतु जागेवर असलेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांनी याआधी सुद्धा अनेकदा प्रयत्न केले आहेत परंतु संतप्त जमावाकडून याआधीसुद्धा विरोध झाल्याने जागा रिकामी झाली नाहीच पण आज पुन्हा बीएमसीचे तोडक पथक दाखल होताच नागरिकांनी कारवाई थांबवण्यासाठी एकच आक्रोश केला. पावसाळा तोंडावर आल्याने आम्हाला जर बेघर केले तर आमचा निवारा कुठे असेल असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय. तसेच पवईकरांना आमची घरे वाचवण्यासाठी पुढे या! असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येतंय. गेली वीस वर्ष आम्ही इथे राहत असून आता तेथील घरे अनधिकृत एका बिल्डरच्या संगनमताने ठरवली जात आहे आणि आम्हाला जागा खाली करण्यास दबाव केला जातोय असा स्थानिकांकडून आरोप होत आहे.