महायुतीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ या तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे ही पारंपारिक जागा भाजपची असल्याने जागा वाटपामध्येही जागा भाजपच लढवणार आहे. मात्र असं असलं, तरी आता माधुरी मिसाळ यांना स्वपक्षातूनच आव्हान उभं राहिलं आहे. पुणे शहरातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. शहरभर भिमाले यांचे बॅनर लागले असून आजपासून श्रीनाथ भिमाले यांनी मतदार नोंदणीला देखील सुरुवात केली आहे. इतकच नाही, तर पक्षाने संधी दिल्यास आपण पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू आणि जिंकून येऊ असा विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यामुळे पर्वतीमध्ये उमेदवार कोण यासाठी भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
२००९, २०१४ आणि २०१९ या तीनही निवडणुकांमध्ये श्रीनाथ भिमाले पर्वती विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. पक्ष आदेशानंतर या तिन्ही निवडणुकांत श्रीनाथ भिमाले यांनी माघार घेतली होती. मात्र आता पंधरा वर्षे थांबल्यानंतर यावेळेस पक्ष आपला विचार करेल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२४मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मताधिक्य घटल्यामुळे माधुरी मिसाळ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र असं असलं, तरी श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभाग क्रमांक २८ सॅलसबरी पार्क येथून मुरलीधर मोहोळ यांना साडेआठ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे भीमालेंचा दावा हा स्ट्रॉंग असल्याचं बोललं जातं आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासूनचं वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या दोनही पक्षांनी पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम यांनी २०१९ साली पर्वती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कदम यांनी पुन्हा एकदा पर्वतीमधून तयारीला सुरवात केली आहे. तर लोकसभा निवडणुकीत नाराज असणारे आबा बागुल यांनी सुद्धा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सुटावा अशी मागणी केली आहे. तर पर्वतीमधून त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीसाठी पर्वती विधानसभा मतदारसंघ चांगलीच डोकेदुखी ठरताना दिसत आहे.