पर्यटकांना गुड न्यूज, दीड तासात गाठा अलिबाग, कॉरिडोरचे काम वेगाने सुरु

म.टा प्रतिनिधी, अमुलकुमार जैन, रायगड : बहुचर्चित असलेला विरार अलिबाग प्रकल्प पुन्हा आता वेगाने सुरु झालाय, २०१६ साली सुरु झालेला प्रकल्प साधारण १२६ किलोमीटर लांबीचा आहे. या कॉरिडॉरमुळे विरार आणि पनवेल अलिबाग अंतर कमी होणार, थोडक्यात विरार ते अलिबाग दीड तास तर पनवेल ते अलिबाग अर्ध्या तासात गाठता येईल. भूसंपादन रखडल्याने हा प्रकल्प बराच वेळ कागदावरच होता पण अखेर आता एमएसआरडीसीने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्वरित पावले उचलत प्रकल्प मार्गी लावलाय.

भूसंपादनाचे काम रखडल्यामुळे प्रकल्प गेला MSRDC

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी खूप कमी वेळात एमएसआरडीसीकडे भूसंपादनाचे काम पूर्ण केले होते.त्यामुळंच सरकारने १२६ किमी लांबीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसीकडे सोपवले आहे. साधारण १२६ किमी लांबीचा महामार्गाच्या कॉरिडॉरचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९८ किलोमीटर आणि दुसर्‍या टप्प्यात २८ किलोमीटर लांबीचा मार्ग बनवण्यात येणार आहे. कॉरिडॉर पालघर,ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर दुसर्‍या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.वडघर ते पनवेल हा ९.१२ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात येईल त्यात १.८ किमी लांबीच्या बोगद्याचाही समावेश असेल.
मुंबई अहमदाबाद प्रकल्पाचा वेग वाढला, नवी मुंबईत ३९४ मीटर बोगद्याचे काम झाले पूर्ण

प्रकल्पाचा प्रस्तावित खर्चाचा अंदाज

पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी सुमारे १८,४३१.१५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या प्रकल्पासाठी १४ कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ११ पॅकेज तयार करण्यासाठी १४ कंपन्यांनी ३३ टेंडर भरलेत. मात्र,त्यातील ७ कंपन्यांचे टेंडर पास करण्यात आले आहे.

वाहतूक समस्या सुटणार

एमएमआरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे, अशा स्थितीत हा मार्ग तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्या कमी होऊन नागरिकांचा प्रवास जलदगतीने पूर्ण करता येणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग,मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू हे अलिबाग-विरार प्रकल्पाला जोडले जातील.या प्रकल्पामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात, महामार्गामुळे पनवेलवरुन केवळ अर्धा तास अलिबाग गाठता येणार आहे.