भाजपनं विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी २ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं प्रत्येकी एक उमेदवार दिलेला आहे. त्यात आता शेकापच्या जयंत पाटील यांची भर पाडल्यानं उमेदवारांची संख्या १२ वर पोहोचली आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालं आहे.
विधान परिषदेसाठी आवश्यक असलेल्या आमदारांची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. मला शरद पवारांनी शब्द दिलेला होता. विजयासाठी आवश्यक असलेली उर्वरित मतं मला इंडिया आघाडीची मिळतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या तिन्ही जागा निवडून येतील, असं पाटील म्हणाले.
राज्याच्या विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता विधान परिषदेत विजयी होण्यासाठी एका उमेदवाराला २३ मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल. महाविकास आघाडीकडे सध्याच्या घडीला ६७ आमदार आहेत. काँग्रेस ३७, ठाकरेसेना १५, राष्ट्रवादी (शरद पवार) १३, शेकाप १ आणि अपक्ष १ असं संख्याबळ मविआकडे आहे. तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना २ मतं कमी पडत आहेत. त्यांना समाजवादी पक्षाच्या २ आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो.
महायुतीनं एकूण ९ उमेदवार दिले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी २०७ मतं लागतील. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांचं बळ आहे. भाजप १०३, शिंदेसेना ३७, अजित पवारांची राष्ट्रवादी ३९, लहान पक्ष ९, अपक्ष १३ असे महायुतीचं संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीला ६ मतं कमी पडतात. एमआयएम २, सपा २, माकप १, क्राँशेप १ असे ६ आमदार तटस्थ आहेत. त्यांची भूमिका विधान परिषदेच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
विधान परिषदेचे उमेदवार खालीलप्रमाणे-
भाजपचे उमेदवार :
1. पंकजा मुंडे
2. योगेश टिळेकर
3.डॉ. परिणय फुके
4. सदाभाऊ खोत
5. अमित गोरखे
शिवसेना :
1. भावना गवळी
2. कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस
1. राजेश विटेकर
2. शिवाजीराव गर्जे
काँग्रेस :
1. प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा
1. जयंत पाटील (शेकाप)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
1. मिलिंद नार्वेकर