परदेशी शिक्षण घ्यायचा विचार करताय? निर्णय घेण्यापूर्वी हे नक्की वाचा, अन्यथा होईल मोठं नुकसान

प्रतिनिधी, मुंबई : देशातील अनेकांचे उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे स्वप्न असते आणि त्यासाठी काहीही करण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची तयारी असते. दिल्ली येथील एक स्वयंसेवी संस्था इंग्लडमधील किंगस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून देते, असे सांगत तिघांनी विक्रोळीतील एक विद्यार्थी आणि त्याच्या आईला नऊ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये एक महिला आपल्या मुलासह वास्तव्यास आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्याने त्याला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे होते. मुलाचा मित्रदेखील विदेशात जाणार असल्याने त्याने या महिलेची ओळख आशुतोष नावाच्या व्यक्तीसोबत करून दिली. आशुतोष आणि त्याचा मित्र विकास व रवी यांनी दिल्ली येथील एका स्वयंसेवी संस्था स्वस्तात विदेशात शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळवून देत असल्याचे सांगितले. यासाठी १३ लाख रुपये खर्च येईल व त्यापैकी नऊ लाख १० हजार तुम्हाला भरायचे आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका, ‘थ्री कोर्स मील’ची मेजवानी, शालेय पोषण आहारात १५ लज्जतदार पदार्थ
विक्रोळीतील या विद्यार्थ्याने आणि त्याच्या आईने स्वस्तात प्रवेश मिळत असल्याने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या तिघांनी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून नऊ लाख १० हजार रुपये घेतले. प्रवेशासाठी भरलेल्या रकमेची पावती, प्रवेश मिळाल्याचे पत्र अशी वेगवेगळी कागदपत्र त्यांनी पाठवली. मात्र, काही दिवसांनी या तिघांनी काही कारणास्तव प्रवेश होऊ शकला नसल्याचे सांगितले. मुलगा आणि त्याच्या आईने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेत झालेल्या फसवणुकीची तक्रार केली. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.