पुण्यातले पब भाजप नेत्यांच्या मालकीचे, त्यात पोलिसांची देखील भागिदारी
पुण्यात जे पब चालतात हे भाजप नेत्यांच्या मालकीचे आहेत, तसेच त्यात पोलिसांची देखील भागिदारी आहे. पहाटे चार पर्यंत चालणारे पब महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले. पण यामध्ये पोलिसांनी कुठे कारवाई केली? कुठे फौजदारी गुन्हे दाखल केले? म्हणजे याचा अर्थ सरळ आहे पोलिसांच्या आशीर्वादाने हे पब सुरू होते. अनधिकृत पबवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, याचे उत्तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना द्यावं. पुणे शहराला लागलेली कीड, सुरू असलेली पाकीट संस्कृती, जे पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल हप्ते घेऊन मालक असल्यासारखे वावरतात त्यांच्याबद्दल आज मी आवाज उठवला आहे. जर पोलीस आणि यंत्रणाच खराब झाली असेल तर पुणेकरांनी या शहरांमध्ये कसं राहायचं? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला.
पुण्यात शिकायला येणारे विद्यार्थी पब संस्कृती घेऊन जाणार आहेत काय?
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात. पुण्यामधून विद्यार्थी नक्की काय घेऊन जाणार आहेत? शिक्षण घेऊन जाणार आहेत की पब संस्कृती घेऊन जाणार आहेत? की अमली पदार्थ सेवन करणारा व्यसनी विद्यार्थी घेऊन जाणार आहे? अशी चिंता आता पालकांना पडली आहे. या सगळ्यांची जबाबदारी पोलिसांची आणि गृहमंत्र्यांची आहे, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.
अन्यथा पोलीस खाते पब मालकांना संरक्षण देते आहे, हे सिद्ध होईल!
पुण्यात सुरू असणारी ही पब संस्कृती कायमची मिटवली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक हे पब मालक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. महानगरपालिकेने कारवाई केली तिथे पोलिसांनी देखील कारवाई करावी अन्यथा पोलीस खाते आणि गृहमंत्रालय पब मालकांना संरक्षण देते आहे, हे सिद्ध होईल, असे धंगेकर म्हणाले.