‘रीडर्स डायजेस्ट’च्या जन्मामागे दोन व्यक्त-अव्यक्त प्रेरणा होत्या. एक पॉझिटिव्ह होती, दुसरी निगेटिव्ह होती. निगेटिव्ह प्रेरणा ही जगात वाढत जाणाऱ्या कम्युनिझमला सौम्यपणे पण ठामपणे विरोध करणे, ही होती. ही प्रेरणा रीडर्स डायजेस्टच्या काही वाचकांना शंभर वर्षांत थेट किंवा बटबटीतपणे जाणवलीही नसेल. मात्र, व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य उचलून धरणे आणि हुकूमशाही किंवा एकाधिकाराला विरोध करणे… हा रीडर्स डायजेस्टमधील मजकुरामागचा अंत:प्रवाह असे. आजही असतो. दुसरी प्रेरणा ही विश्वकल्याणवादी ख्रिश्चॅनिटीची होती आणि आहे. ख्रिस्ती धर्माच्या या तत्त्वांमध्ये सगळ्यांचे कल्याण व्हावे, आसपासच्या सर्वांशी दयाबुद्धीने वागावे, मदतीला धावून जावे, सद्गुणी व परोपकारी असावे आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाने एकत्र राहून व नात्याचे बंध टिकवून छोटे-मोठे आनंद घ्यावेत… अशा अनेक गोष्टी होत्या. जगभरात रीडर्स डायजेस्टचे अनेक अभ्यास झाले. त्यात त्यातली सदरे, लेख, मजकूर आणि विनोद यांचे विश्लेषण झाले आहे. कुटुंबाला बांधून ठेवणे, कुटुंबाने एकत्र आनंद घेणे आणि हे करताना विविध मार्गांनी पण हसतखेळत आपले जीवन थोडे थोडे उन्नत करत नेणे… ही रीडर्स डायजेस्टची चौकट आहे. त्यातले शब्दांचे खेळ, युनिफॉर्म म्हणजे पोलिस व लष्करातील विनोद, जीवनातल्या गमतीदार प्रसंगाचे वाचकसदर, जगात जागोजागी समाजासाठी काम करणाऱ्यांची नेमकी माहिती… ही सारी आखणी या चौकटीला धरून होती.
अमेरिकेत सन १९२२मध्ये जन्म झाल्यावर अमेरिकी वाचकाला या मासिकाची भुरळ पडली. खप वाढत गेला. अमेरिका व ब्रिटन यांचे नाते सर्वांना माहीत आहे. रीडर्स डायजेस्टने अमेरिकेबाहेर पहिले पाऊल टाकले, ते ब्रिटनमध्येच. सन १९३८ मध्ये. भारताच्या स्वातंत्र्याच्या नऊ वर्षे आधी. तेव्हा ब्रिटिश इंडियाचा भाग असणाऱ्या भारतात व पाकिस्तानात स्वातंत्र्यांनतर सहा वर्षांनी म्हणजे सन १९५४मध्ये रीडर्स डायजेस्ट आले. ब्रिटनमध्ये ते आले तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे नगारे वाजू लागले होते. पण सन १९३९ ते सन १९४५ या काळात ब्रिटिशांचे जे काही मनोधैर्य टिकले व जपले गेले त्यात या मासिकाचाही काही वाटा होता. पुढे रीडर्स डायजेस्टने ‘इलस्ट्रेटेड स्टोरी ऑफ वर्ल्ड वॉर टू’ हा ग्रंथ छापला. त्यात विन्स्टन चर्चिल, डग्लस मॅकार्थर, कॉर्नेलिस रिआन असे दिग्गज लेखक होते. असा प्रवास करणारे ब्रिटनमधील रीडर्स डायजेस्ट आता थांबले आहे…
अमेरिकन, ब्रिटिश किंवा जगातील कोणत्याही रीडर्स डायजेस्टला कधी अभिजाततेचा तोरा नव्हता; उलट, समाजातील सर्व वर्गांशी जोडून घेण्याची आस त्यात होती. याच मासिकाने मार्केटिंगचे अधिक आपलेपणाचे, अनौपचारिक सूत्र अवलंबले आणि त्याचा त्यांना जगभरात फायदा झाला. ‘आम्ही तुम्हाला उपदेश करीत नसून आपण गप्पा मारतो आहोत,’ ही भूमिका वाचकांना आवडणारी होती. त्यामुळेच, जगभरातील हजारो-लाखो वाचकांनी सरलेल्या महिन्याच्या अंकांना कधी रद्दी मानले नाही. आपले सोबती मानले आणि वर्षानुवर्षांचे खंड आपल्याकडे जपून ठेवण्यामध्ये भूषण मानले. जगभरात अशा वाचकांचे अनौपचारिक क्लब झाले. जगाचे भू-राजकीय नकाशे, प्रसिद्ध लेखकांच्या लघु कादंबऱ्यांची छोटेखानी पुस्तके, आरोग्य, विज्ञान पुस्तिका प्रकाशित करणे हे या मासिकाचे वेगळेपण होते. माहिती-ज्ञानाच्या प्रसारासोबतच वाचकांना आकृष्ट करण्यासाठी ग्रंथ साहित्यापासून नित्य वापराच्या वस्तू अंकासोबत मोफत देण्याचे तंत्रही राबवले गेले. इतकेच नव्हे, वाचकांचा पाठपुरावा करताना वाचकांशी पत्रव्यवहार करण्यात ‘रीडर्स डायजेस्ट’चा हात धरणारे कुणी नव्हते. मात्र, हा पाठपुरावा आपुलकीचा, प्रेमाचा असे. त्यात वर्गणीबरोबर मिळणाऱ्या भेटी अनेकदा जगाचा इतिहास, जगाच्या भूगोलाचे पुस्तक किंवा अशी ज्ञानवर्धक पुस्तके असत.
आज ब्रिटिश आवृत्ती बंद पडत असली तरी नव्वदच्या दशकात सुरू झालेला डिजिटायझेशनचा प्रपात आणि रीडर्स डायजेस्टचा ओसरता प्रवाह या दोन्ही प्रक्रिया एकदमच झाल्या आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया, झेक रिपब्लिक, चीन, थायलंड, इंडोनेशिया… आदी देशांमधील रीडर्स डायजेस्टची छापील आवृत्त्या या आधीच बंद पडत गेल्या आहेत. ब्रिटनमध्येही प्रकाशन बंद करण्यापूर्वी सन २०१०मध्ये मासिकाची विक्री होऊन ती दुसऱ्या कंपनीकडे गेली. खुद्द अमेरिकेतील मूळ कंपनीवरही काही वर्षांपूर्वी कर्जाचा प्रचंड बोजा झाल्यामुळे दिवाळखोरीचे संकट आले होते. भारतातील रीडर्स डायजेस्ट सध्या ‘इंडिया टुडे’ समूहाच्या मालकीचे आहे आणि ते व्यवस्थित चालू आहे…
एकेकाळी जगभरात रीडर्स डायजेस्टच्या एकूण वाचकांची संख्या १५ ते १७ कोटींच्याही वर होती. अर्थातच, हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे प्रकाशन होते. आजही सात कोटी वाचक, दीड कोटींपेक्षा जास्त प्रती, ७० देश, २१ भाषा आणि ४९ आवृत्त्या हा विस्तार किंवा व्याप काही कमी नाही. मात्र, तो हळूहळू कमी होतो आहे. छापील प्रतींऐवजी डिजिटल अंकाकडे वाचक जात आहेत. त्यामुळेच, वेबसाइटला ८५ ते ९० लाख वाचक भेट देतात, याचे समाधान मानून घ्यावे लागते.
सन १९८९मध्ये डॉन हेनलेचा ‘द एण्ड ऑफ द इनोसन्स’ हा आल्बम आला. त्याने लोकप्रियतेचे आणि विक्रीचे उच्चांक केले होते. हा जागतिकीकरण भरात येण्याचा काळ. आपणही सन १९९१मध्ये या पर्वात प्रवेश केला. इनोसन्स हा ‘बावळट’ नसतो, शहाणा इनोसन्सही असतो. ओशोंनी त्यावर बरेच भाष्य केले आहे. हा शहाणा इनोसन्स आता सारे जग टाकून देते आहे. या प्रवासात जुन्या सोबत्यांची गरज नसते. कदाचित साऱ्या जगभरच अशी पडझड आणि कोसळणूक चालू आहे. ब्रिटिश रीडर्स डायजेस्ट बंद पडणे, ही त्यातली एक छोटीशी काडी आहे…