पक्षाने मोठ्या नेत्यांना अवघड भागातील जबाबदारी द्यावी, रोहित पवार यांचा रोख कुणाकडे?

दीपक पडकर, बारामती : राजकारणात विचार फार महत्त्वाचा असतो. हा विचार सोडून भाजपसोबत गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले नाही. ते जागेवर असते तर कदाचित २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असे विधान आमदार रोहित पवार यांनी बारामतीत व्यक्त केले. अजित पवार यांना परतायचे असल्यास त्याचा निर्णय शरद पवार हे घेतील. अजित पवार सांगतात त्याप्रमाणे मी बच्चा राहिलेलो नसलो तरी एवढ्या मोठ्या प्रश्नावर मी बोलू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुढील १५ दिवसात परततील. ते न परतल्यास तेथे नवीन चेहरे दिले जातील मग त्यांच्या परतीचा मार्गही बंद होतील, असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकाराची संवाद साधला. लोकसभेला आमच्या पक्षाचा एवढा दणदणीत विजय होईल हे माहित नसल्याने काही नेते रात्रीच्या अंधारात भाजप-मित्रपक्षांना भेटले. ते कोणत्या जागेसाठी भेटले, ते नेमकी कोणती अॅडजेस्टमेंट करत होते, हे लवकरच बाहेर येईल. असे सोयीचे राजकारण कोणता नेता करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. विधानसभेसाठी अशा गोष्टी घडू नयेत, याची खबरदारी वरिष्ठ नेत्यांनी घ्यावी, असे सांगून आमदार रोहित पवार यांनी या नेत्याचे नाव जाहीर करणे टाळले.
Sharad Pawar: पवार है तो मुमकिन है! पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली

अजूनही दडपशाही सुरुच आहे

बारामतीत जनाई-शिरसाईच्या लाभार्थ्यांनी प्रचार काळात काही अडचणी मांडल्या होत्या. त्या समजून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आम्ही बैठका घेत आहोत. परंतु या बैठकांना जावू नये, असे निरोप लोकांना दिले गेले. निवडणुकीपर्यंत सुरु असलेली दडपशाही अजित पवार यांच्याकडून अजूनही सुरुच आहे. ते उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आहेत, परंतु सुळे येथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा हक्क नाही का? असा सवाल आमदार पवार यांनी केला. या बैठकांना मलिदा गॅंग नव्हे तर सामान्य लोक येतील. शरद पवार यांनी ही योजना मंजूर करून आणली होती. ११ ते १३ जूनच्या दरम्यान स्वतः पवार त्यासंबंधी बैठका घेणार असल्याचेही आमदार पवार म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही

जयंत पाटील हे आमचे मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. मला पक्ष संघटनेत काम करायचे आहे. परंतु प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही. युवकांसाठी काम करण्यासाठी मला पक्षाने पद दिले तर मी नक्कीच न्याय देईन. पक्षाने मोठ्या नेत्यांना अवघड भागातील जबाबदारी देत पक्ष वाढवावा, असे ते म्हणाले.