मुंबई काँग्रेसमधील १६ बड्या नेत्यांनी हे निवेदन मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यात पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने याप्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचवेळी या सर्व प्रश्नांवर या सर्व नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीची वेळही मागितली असून त्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांनी लवकरच मुंबई भेटीवर येण्याची मागणीही यावेळी या निवेदनात केली आहे.
या निवेदनात मुंबई काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आणि काही दिवसांपूर्वीच मुंबईत राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा दाखल झाली होती, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातवरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसमधील हा उत्साह कायम ठेवण्याची गरज या निवेदनात नमूद करताना पक्षात काही संघटात्मक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे.
त्याशिवाय पक्षातील काही स्थानिक समित्यांचे पुर्नजिवन करण्याची आवश्यकता असून पक्षाचे धोरण आणि रणनीती प्रभावीपणे सामान्य नागरिकांसमोर घेऊन जाण्याची गरज असल्याचेही यात नमूद केले गेले आहे. राज्यात येत्या काळात होणारी विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही बांधणी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे असल्याचे या निवेदनात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.