गत सात ते आठ वर्षांत पंकजा मुंडे यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. पक्षांतर्गत विरोधकांना त्यांना सामोरे जावे लागले. त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अशाही परिस्थितीत पंकजा यांनी लढाईचे मैदान सोडले नाही. मागील २ वर्षांत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजप पक्षसंघटनेत काम केले. ज्या ज्या वेळी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक व्हायची त्या त्यावेळी पंकजा यांच्या उमेदवारीची चर्चा व्हायची. परंतु पंकजा यांना उमेदवारी दिली जात नसे. परंतु यावेळी लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षावर प्रचंड दबाव होता. त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपने त्यांना निवडूनही आणले.
पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाऊ लागले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला. भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना वजनदार खाते देण्यात आले. परंतु काहीच काळात त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा समोर आल्यानंतर पक्षात त्यांचे खच्चीकरण झाल्याचे बोलले जाते. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. याच काळात त्यांना पक्षांतर्गत विरोधाला मोठ्या प्रमाणात सामोर जावे लागले.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पंकजा यांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याशी दोन हात करावे लागले. या निवडणुकीत त्यांचा धक्कादायकरित्या पराजय झाला. तेव्हापासून गेल्या ५ वर्षांत त्या अडगळीत पडल्या होत्या. राज्याच्या राजकारणातही त्या फारशा सक्रीय नव्हत्या. अखेर दिल्लीतील वरिष्ठ पक्षनेतृत्वाने भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांना संधी दिली. लोकसभेतही त्यांना उमेदवारी दिली. परंतु ओबीसी-मराठा राजकारणात त्यांचा बळी जाऊन सलग दुसऱ्या पराजयाला त्यांना सामोरे जावे लागले.
आजच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय पक्का मानला जात होता. कारण जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची २३ मते भारतीय जनता पक्षाकडे होती. तसेच पंकजा यांच्यासाठी भाजपने विशेष रणनीती देखील ठरवली होती. त्यानुसार टिळेकर यांच्यापाठोपाठ पंकजा यांचा विजय झाला. विजयानंतर पंकजा यांच्या समर्थकांनी बीडमध्ये आणि मुंबईत मोठा जल्लोष केला.