राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेल्या दणदणीत यशानंतर शरद पवार यांनी नवनिर्वाचित खासदारांची बैठक मुंबईतील पक्ष कार्यालयात बोलावली. या बैठकीत सर्व खासदारांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्य काळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर संसदेत आपण आवाज उठवाल, अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांनी खासदारांकडे व्यक्त केली. बैठकीनंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांसहित शरद पवार आणि जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे गुरूजी, वर्ध्याचे खासदार अमर काळे, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेला सुरूवात होताच बजरंग सोनवणे यांना शरद पवारांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची सूचना जयंत पाटील यांनी केली. बीडमध्ये आम्हाला बजरंगी बाप्पा पावले, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य होते. पत्रकार परिषदेत बजरंग बाप्पांचा आवर्जून नामोल्लेख करून त्यांच्या विजयाचे महत्त्व जयंत पाटील यांनी थेटपणे अधोरेखित केले.
नवनिर्वाचित खासदारांपैकी सुप्रिया सुळे आणि निलेश लंके हे मतदारसंघातील व्यक्त कार्यक्रमांमुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. लोकसभेचा निकाल पाहून अजित पवार गटातील कुणी आमदार आपल्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, ‘सध्या मला याविषयावर बोलायचे नाही. योग्य वेळेला मी यावर बोलेन’