विधान परिषदेसाठी भाजपनं पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपनं ५ जणांना आमदार करत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सामाजिक आणि भौगोलिक संतुलन राखलं आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचा ‘माधव’ पॅटर्न भाजपनं परिषदेच्या निवडणुकीत राबवला. लोकसभेत भाजपची झालेली वाताहत पाहता पक्षानं विधानसभेआधी हाच प्लान ऍक्टिव्ह केला.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा भागांमधील नेत्यांना आमदार करत भाजपनं भौगोलिक समतोल राखला आहे. विधानसभेपाठोपाठ लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपनं परिषदेवर संधी दिली. त्या वंजारी समाजातून येतात. त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. मराठा आंदोलनांना जोर धरलेला असताना भाजपनं मुंडेंना आमदारकी दिली आहे.
योगेश टिळेकर पुण्याच्या हडपसरचे माजी आमदार आहेत. ते २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंकडून पराभूत झाले. ते अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हडपसरची जागा राष्ट्रवादीकडे जाईल. आता भाजपनं टिळेकरांना परिषदेवर घेत संभाव्य संघर्ष टाळला आहे. टिळेकर माळी समाजातून येतात. ओबीसींमध्ये माळी समाजाचं प्रमाण मोठं आहे. भाजपनं अमित गोरखेंना परिषदेवर संधी देऊन मातंग समाजाला प्रतिनिधीत्व दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाची चर्चा होती. ती भाजपला महागात पडली. मागासवर्ग भाजपपासून दुरावला. आता गोरखेंना उमेदवारी देत भाजपनं मागासवर्गीयांना साद घातली आहे.
परिणय फुके कुणबी समाजातून येतात. ते भंडारा-गोंदियातून लोकसभा लढवण्यास उत्सक होते. पण त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. आता त्यांची परिषदेवर वर्णी लावली आहे. याआधी त्यांना २०१६ मध्ये परिषदेवर संधी देण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांनी साकोलीमधून नाना पटोलेंविरोधात विधानसभा लढवली. पटोलेंनी त्यांचा पराभव केला. यंदा भाजपनं लोकसभेत भंडारा-गोंदियाची जागा गमावली. विदर्भात पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. त्यामुळे आता फुके यांच्या रुपात विदर्भाला परिषदेत प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे.
रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देत भाजपनं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाज असं समीकरण साधलं आहे. खोत शेतकरी नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे आहेत. लोकसभेला भाजपला पश्चिम महाराष्ट्रात केवळ दोन जागा मिळाल्या. सातारा, पुण्याचा वगळता बाकीच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्यामुळेच खोत यांच्या रुपात भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातील चेहऱ्याला परिषदेत स्थान दिलं आहे.