विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना, त्यांना परीक्षा रद्द करून शिक्षा आणि मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे. पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास ती पेपरफुटी होणाऱ्या राज्यातील घ्यावी, असे स्पष्ट मत विद्यार्थी मांडत आहेत. न्यायालयीन प्रकरणामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे सरकारने ‘नीट’च्या गुणांवर प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
‘कडक शिक्षेची तरतूद हवी’
‘नीट’मध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर सरकारने अतिशय कठोर कारवाई करायला हवी. आगामी प्रवेश परीक्षांमध्ये असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणातील दोषींना मोठा दंड ठोठवावा. ही रक्कम न भरल्यास पुन्हा काही वर्षे शिक्षा, अशी तरतूद करावी. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ८५ टक्के जागा राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या जागांवर प्रवेशाचा निर्णय हा राज्य सरकारने घेण्याबाबत विचार करावा,’ अशी भूमिका ‘डीपर’चे संस्थापक हरीश बुटले यांनी घेतली आहे.
दोन वर्षे मेहनत करून, ‘नीट’मध्ये ७२० पैकी ७२० गुण मिळवले. या गुणांवर मला ‘एम्स, दिल्ली’त प्रवेश मिळणार आहे. असे असताना नव्याने परीक्षा घेतल्यास माझ्यासारख्या विद्यार्थ्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा सरकारने विचार करावा. या संपूर्ण प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. परीक्षा होऊन दीड महिने झाले आहेत. आम्ही आता कुठे परीक्षेच्या दडपणातून बाहेर आलो असून, एमबीबीएसच्या प्रवेशाचे वेध लागले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने प्रवेशप्रक्रिया सुरू करावी.
– नेहा माने, ‘नीट’ गुणवंत
शाळेत असतानाच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. त्यानुसार, अभ्यासात कधीही कमी पडलो नाही. शाळेच्या परीक्षेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेतही चांगले गुण मिळवले. अकरावी, बारावीत एवढा अभ्यास केला की, कोणता छंद जोपासायला, मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळच मिळाला नाही. ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवून चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा एवढाच ध्यास होता. त्यानुसार, ७२० पैकी ७०० गुण मिळवले. मात्र, आता एका दोषी व्यक्तीची शिक्षा म्हणून परीक्षा रद्द होण्याच्या चर्चा सुरू आहेत. हे चुकीचे असून, आमच्यावर अन्याय आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची काहीही चूक नसल्याने, त्यांची पुन्हा परीक्षा नको. आता तातडीने प्रवेशासाठी कौन्सेलिंग राउंड सुरू करावेत.
– हर्षवर्धन सुकळकर, ‘नीट’ गुणवंत