निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचे नाव यादीतून ‘गायब’, निवडणूक कार्यालयात तक्रारींचा ओघ सुरूच

प्रतिनिधी, धायरी/पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना, खडकवासला मतदारसंघातील मतदारांना मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते आहे. गेल्या निवडणुकीत मतदान करूनही यंदा अनेक मतदारांचे नाव यादीतून ‘गायब’ झाले आहे. मतदान होण्यापूर्वीच नावे मिळत नसल्याने निवडणूक कार्यालयात तक्रारींचा ओघ सुरू आहे; परंतु शेवटच्या क्षणी मतदान यादीत नाव समाविष्ट करता येत नसल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये अनेकदा मतदार यादीतून नावे गायब झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. निवडणूक आयोगाकडून नाव शोधण्यासाठी वेबसाइट-ॲप विकसित करण्यात आले असून, दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया सातत्याने केली जाते, असे स्पष्टीकरण यापूर्वीच देण्यात आले आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी १० दिवसांपर्यंत मतदानासाठी नाव नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक मतदारांनी त्या वेळी काहीसे दुर्लक्ष केल्याने आता मतदार यादीत नाव सापडत नसल्याने ते शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

पुण्यात प्राणांतिक अपघातांमध्ये मोठी घट, पहिल्या दहा क्रमांकामध्ये असणारे पुणे ३९व्या क्रमांकावर
बारामती लोकसभेमध्ये येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच मतदारांनी लोकसभेच्या यादीत नाव मिळत नसल्याची तक्रार केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले होते; परंतु लोकसभेच्या मतदार यादीत त्यांचे नाव नाही. यातीब बहुतांश मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे; पण मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. मतदान यादीत नाव सापडत नसल्याने मतदारांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडे तक्रार केली असून, काहींनी निवडणूक शाखेकडे गाऱ्हाणे मांडले आहे.

बऱ्याच मतदारांना फटका

खडकवासला मतदारसंघात बहुसंख्य मतदार सोसायट्यांमध्ये राहतात. या सोसायट्यांमधील काही मतदारांची नावे मतदार यादीत आहेत, तर काही नावांचा शोधच लागत नसल्याचे सांगण्यात येते. एकाच घरातील चार मतदारांपैकी दोन किंवा तीन मतदारांची नावे यादीत असली, तरी एखादे नाव अचानक यादीतून गायब झाल्याचे आढळून आले आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. पुण्यात २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार यादीतून अनेकांची नावे गायब झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर, मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम हाती घेण्यात येऊन नावे, छायाचित्रे ‘दुबार’ असल्यास अशी नावे वगळण्यात आली होती. त्याचा फटका बऱ्याच मतदारांना बसण्याची भीती आहे.

मतदार यादीतून नाव गायब झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मतदार यादीतील नाव शोधून देण्यासाठी विविध उपायोजना केल्या जात आहेत. काही मतदारांच्या मागणीनुसार त्यांचे मतदान केंद्र बदलण्यात आले आहे. दोन नावे सारखी, दोन फोटो सारखे असलेली नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये चुकून एखाद्या मतदाराचे नाव वगळले गेले असेल, तर त्या संदर्भात चौकशी केली जाईल.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे

मतदारांसाठी विशेष कक्ष

सिंहगड रस्ता परिसरात अनेक राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या फक्त मतदार यादी घेऊन आपल्या मतदारांची नावे आहेत काय, हे शोधण्यासाठी मदत करीत आहेत. खडकवासला मतदारसंघातील मतदारांसाठी सिंहगड इन्स्टिट्यूट येथे मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. यामध्ये मतदारांचा ओळखपत्र क्रमांक शोधणे, मतदान केंद्र शोधून देणे अशा स्वरूपाची मदत सर्वांनी केली जात असल्याचा दावा उपविभागीय अधिकारी संजय असवले यांनी केला.