महायुतीमधील कोणत्याही उमेदवाराचा पराभव झाला असता, तर विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला असता. त्यामुळे तिन्ही पक्षांनी मतांचं योग्य नियोजन करत ९ उमेदवार निवडून आले. मिलिंद नार्वेकरांचे एकनाथ शिंदेंशी उत्तम संबंध आहेत. जवळपास सगळ्याच पक्षांमधील नेत्यांशी नार्वेकरांचे सलोख्याचे संबंध असल्यानंच ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली. नार्वेकर रिंगणात असल्यानं शिंदेसेनेचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता होती. पण क्रॉस व्होटिंग टाळत शिंदेंनी महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणले.
भाजपच्या पहिल्या चारही उमेदवारांना प्रत्येकी २६ मतं मिळाली. विजयासाठी २३ चा कोटा होता. त्यामुळे भाजपच्या चार उमेदवारांना १२ अतिरिक्त मतं मिळाली. तर पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची १४ मतं मिळाली. भाजपच्या ४ उमेदवारांची अतिरिक्त मतं खोत यांना दुसऱ्या फेरीत ट्रान्सफर झाली. १२ मतं मिळाल्यानं खोत यांना मिळालेली मतं २६ पर्यंत पोहोचली. ते विजयी झाले. तर नार्वेकरांना पहिल्या फेरीत २२ मतं मिळाली. त्यांना दुसऱ्या फेरीत एकाच मताची गरज होती. त्यामुळे ते सहज निवडून आले.
एकनाथ शिंदेंनी महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणले. नार्वेकरांना सेफ केले. मुख्यमंत्र्यांनी अचूक डावपेच आखत शेकापच्या जयंत पाटलांचा गेम केला. या खेळीतून त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. नार्वेकरांना विजयी करत त्यांनी वैयक्तिक संबंध जपले. पण नार्वेकर विजयी होऊनही उद्धव ठाकरे व्हिलन ठरले. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे असलेल्या एकत्रित मतांच्या आधारे जयंत पाटील यांचा विजय शक्य असतानाही ठाकरेंनी नार्वेकरांना उमेदवारी दिली, त्यांना विजयी केलं. त्यासाठी त्यांनी मित्रपक्षाच्या नेत्याचा बळी दिला असा मेसेज या निवडणुकीमुळे गेला.
नार्वेकरांचे भाजप, शिंदेसेनेतील आमदारांशी असलेले संबंध पाहता महायुतीच्या उमेदवारांना धोका होता. तो शिंदेंनी चतुराईनं टाळला. जयंत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवारांना अडचणीत आणण्याची खेळीदेखील शिंदेंनी उलथवली. जयंत पाटील यांचा पराभव घडवून आणत त्यांनी रायगडमध्ये शेकापला शह दिला. रायगड, मावळ या मतदारसंघात शेकापची ताकद आहे. जयंत पाटील परिषदेवर गेले असते तर त्यांची ताकद वाढली असती. ती रोखण्याचं काम शिंदेंनी परिषदेच्या निवडणुकीतून केलं.
रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेसेनेचे आमदार यांच्यात चांगला ताळमेळ आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेच्या तीन आमदारांनी तटकरेंना मताधिक्क्य मिळवून दिलं. अलिबाग, महाड, दापोलीतून तटकरेंना लीड होतं. तटकरे ८२ हजार मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीसोबत असलेला ताळमेळ कायम ठेवून मविआत असलेल्या शेकापचा गेम करण्याची कामगिरी शिंदेंनी करुन दाखवली.
शेकापचे जयंत पाटील विजयी झाले असते तर रायगडमध्ये ठाकरेसेनेलादेखील बूस्ट मिळाला असता. शेकाप महाविकास आघाडीचा भाग असल्यानं विरोधकांची ताकद वाढली असती. पण पाटील यांच्या पराभवानं सगळीच गणितं बिघडली. ठाकरेंनी नार्वेकरांना निवडून आणल्यानं पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. ठाकरेसेना आघाडीतील लहान पक्षांचा घास घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मविआतील घटक पक्षांमध्ये अविश्वास निर्माण करण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.