राज्यातील समस्यांची यादी मोठी आहे. अमरावतीत दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. हे चित्र विदारक असल्याचं म्हणत त्यांनी टाईम्स ऑफ इंडियानं शेतकरी आत्महत्यांबद्दल दिलेल्या बातमीचा संदर्भ दिला. सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्या सुरु असलेलं अधिवेशन महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असल्याचा टोला त्यांनी लगावला.
संसदीय कामकाज मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात उद्धव ठाकरेंची भेट झाली. त्यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीचे ठाकरेसेनेचे उमेदवार अनिल परब यांचं ऍडव्हान्समध्ये अभिनंदन केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पाटील यांना पेढा दिला. त्यानंतर पाटलांनी त्यांना चॉकलेट दिलं. त्यावर ठाकरेंनी असंच प्रेम कायम राहू द्या असे उद्गार काढले. यानंतर ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात लिफ्टजवळ भेट झाली. दोन्ही नेत्यांनी सोबत प्रवास केला. या दोन्ही भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या.
देवेंद्र फडणवीस यांची भेट योगायोगानं झाल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत भेटीवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील यांचीही भेट झाली. फडणवीसदेखील भेटले. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे असं या भेटींमध्ये काही नाही. ती भेट केवळ योगायोग होता, असं ठाकरेंनी सांगितलं. भिंतीला कान असतात. तसे लिफ्टला नसतात. त्यामुळे यापुढे सगळ्या गुप्त बैठका तिथेच घ्यायला हव्यात, असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावर महायुतीच्या अपयशाचा धनी कोण ते आधी त्यांना ठरवू दे, असं ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र असं ठाकरेंनी म्हटलं.