तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील कुटुंबीयसह कारमधून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर कुटुंबीयासमवेत ते तासगावला परतत होते. मध्यरात्री तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा ताबा सुटल्यामुळे त्यांची कार कालव्यात कोसळली. मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघाताची माहिती सकाळी आजूबाजूच्या लोकांना समजली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५६), त्यांच्या पत्नी सुजाता पाटील (वय ५२, रा. तासगाव), मुलगी प्रियांका अवधूत खराडे (वय ३३), नात दुर्वा अवधूत खराडे (वय ५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (वय १, सर्व रा. बुधगाव, ता. मिरज) आणि नात राजवी विकास भोसले (वय २, रा. कोकळे) यांचा जागीच मृत्यू झाला. पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले (वय २६) ही गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
राजवीचा वाढदिवस ठरला अखेरचाच
राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र; वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांसोबत आजोळी जात असताना काळाने घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला. पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली असून, या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.