नसीम खानजी, हिंमत दाखवा, काँग्रेसला लाथ मारा, MIM च्या तिकिटावर लोकसभा लढवा, जलील यांची ऑफर

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे माजी मंत्री आरिफ नसीम खान नाराज झाले आहेत. पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि काँग्रेसच्या आगामी टप्प्यातील स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर एमआयएमने नसीम खान यांना खुली ऑफर दिली आहे. एकदा हिंमत दाखवा, काँग्रेसला सोडा, मुंबईत तुम्ही सांगाल त्या लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देऊ, असं एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील खासदार आणि उमेदवार इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलील यांची ऑफर काय?

इम्तियाज जलील म्हणाले, की मी वारंवार महाविकास आघाडीविषयी बोलत आलो आहे, की त्यांना मुसलमानांची मतं पाहिजेत, पण मुस्लीम नेतृत्व नकोय. यंदा महाराष्ट्रात त्यांनी एकही जागा मुस्लिम उमेदवाराला दिलेली नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी मुंबई नाही, तर किमान राज्यभरात कमीत कमी एक जागा तरी मुस्लीम समाजातील उमेदवारासाठी सोडायला हवी होती, अशी अपेक्षा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
३६ कोटी मालमत्ता, पत्नीकडे ४२ लाखांचे दागिने, सात गाड्या, पवारांचे उमेदवार श्रीराम पाटील संपत्तीत किंग
नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी पक्षालाच लाथ मारायला पाहिजे होती, त्यांना समजायला हवं की काँग्रेसला मुस्लीम समाजाची मतं पाहिजेत, पण नेतृत्व नकोय. नसीम खानजी, तुम्ही फक्त एकदा हिंमत दाखवा, त्यांना सोडा, आणि आमच्या पक्षात सामील व्हा. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करु. तुम्ही मुंबईतील कोणतीही जागा सांगा. आम्ही अगदी जाहीर केलेले उमेदवारही मागे घेऊ आणि तुम्हाला संधी देऊ, अशी खुली ऑफरच इम्तियाज जलील यांनी काँग्रेस नेते नसीम खान यांना दिली आहे.

उमेदवारी मिळाली, नाराजी दूर; वर्षा गायकवाड मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

नसीम खान यांची नाराजी का?

‘कॉँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कमजोर परिस्थितीतही पक्षाने दिलेल्या सर्व आदेशांचे कठोर पालन मी करत आलोय. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिलेली, तीही मी प्रामाणिकपणाने पार पाडली. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. याबाबत नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत’, अशी नाराजी नसीम खान यांनी काँग्रेसला दिलेल्या पत्रात नमूद केली आहे.