नवीन कार, पहिलं दर्शन बाप्पाचंच; पण परतीच्या वाटेवर नियतीने डाव साधलाच अन्…थरारक घटना

प्रतिनिधी, पुणे : नवीन कार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा घरी चाललेल्या तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. लोणीकंद-थेऊर रस्त्यावर रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला.

काय घडलं?

गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६) आणि विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघे रा. सणसवाडी) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. पाबळ चौक, शिक्रापूर) जखमी झाला आहे.

या प्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव यांनी नवीन कार खरेदी केली होती. त्यानंतर गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल आणि हेंमत कार घेऊन रविवारी थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास दर्शन घेऊन ते कारमधून लोणीकंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी जोगेश्वरी मंदिरासमोर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर चौघेही गंभीर जखमी झाले.
गाडीवरचा ताबा सुटला, कार थेट नदीत बुडाली; बाप-लेकाचा मृत्यू, कळमेश्वरमधील घटना
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच गणेश, विनोद, विठ्ठल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. लोणीकंद पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.