लोकसभा निवडणुकीतील जोरदार यशानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेल येथे बैठक झाली. या बैठकीत स्वत: शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही बैठक बोलविण्यात आली होती.
एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले, आपल्याला राज्यात पुन्हा आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्यात पुन्हा आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे, यासाठी तुम्ही कामाला लागा. तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची कामे व्हायला पाहिजेत. लोकांच्या संपर्कात राहा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध नसतो. त्यांचे राज्यात जास्त प्रश्न असतात. पण तरीही तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर लक्ष ठेवून राहा. येत्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुका होतील, लोकसभा निवडणुकांची पुनरावृत्ती आपल्याला विधानसभा निवडणुकीत करायची आहे, असे पवार म्हणाले.
विधानसभेत चांगल्या जागा मिळतील
महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये, यासाठी लोकसभेला कमी जागांवर समाधान मानले. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्रात आपली मोठी ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असे शरद पवार म्हणाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश संचारल्याचे बैठकीत एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही लोकांचा असाच मूड दिसेल, शरद पवार यांचे बारामतीत विधान
शरद पवार तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ३१ जागांवर विजयी झाली आहे. तिन्ही पक्षांच्या जागा लोकसभेला वाढल्या आहेत. जवळपास १५५ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीला लीड मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठीची सुरूवात आम्ही केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनतेचा असाच मूड दिसेल असा मला विश्वास आहे.’