नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरेंची सांगवीत पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

प्रतिनिधी, पिंपरी : ‘शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे सिंहासन जाळून भस्म करील,’ असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. ‘जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवी येथे आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, सुप्रिया सुळे, चंद्रकांत हंडोरे, आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले तर आम्ही देऊ; पण पाठीत वार केला तर वाघनखाने पलटवार करू. मुले चोरली, बाप चोरले आता पक्ष कसा चोरता तेच बघतो,’असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याच्या मुद्यावरून जाब विचारताना ठाकरे यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर लुटलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ‘बाकी सगळे कंत्राटी, मी मात्र कायमस्वरूपी’ असा अविर्भाव असलेल्या पंतप्रधान मोदी यांना चार जूनला मतदार कंत्राटमुक्त केल्याचे दाखवून देईल, असा दावाही ठाकरे यांनी केला.

‘मोदी सुखात मीठ कालवत आहेत,’ असा आरोप करून ‘महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल. पंतप्रधानांनी उद्योगपती अदानी, अंबानींवर बोलताना त्यांना दिलेली कंत्राटे आधी रद्द करावीत,’ अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
– मोदी सरकार नव्हे; विसराळू गझनी सरकार
– सरकार आपल्या दारी नाही; जा आपल्या घरी
– नोटबंदी केली; आम्ही मोदींची नाणेबंदी करणार
– असली शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली
– पराभवाच्या भूताची भीती म्हणून राम-रामचा जप
राजकारणात भाजपला मुलं झाली नाहीत, त्यांना मुले होत नाही त्यात माझी काही चूक? उद्धव ठाकरेंकडून खरपूस समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त खोटे बोलण्याची गॅरंटी आहे. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये, सन २०२२ पर्यंत पक्की घरे याचे काय झाले, याचा जाब विचारला पाहिजे. भारतीय झूठ पार्टी ‘अब की बार तडीपार’ होणार आहे.- संजय सिंह, खासदार

मोदी सरकारकडून आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक आणि राजनैतिक भ्रष्टाचार चालू आहे. महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे. त्यामुळे देशभरात मोदीविरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

देशात सध्या गलिच्छ राजकारण चालू आहे. त्यामुळे हवा आपल्याच बाजूने आहे. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी मतदान करा. मावळमध्ये रामकृष्ण हरी, आमची मशाल भारी हा नारा बुलंद करायचा आहे. स्वाभिमान राखायचा आहे.- सुप्रिया सुळे, खासदार