धंगेकर कसब्याची पुनरावृत्ती करणार की मोहोळ बाजी मारणार? पुण्यात काय होणार?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर हे रिंगणात होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत तिघेही नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले होते. पुढे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर आमदार झाले.
  • मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीत पुढे, मुरलीधर मोहोळ २९ हजार ३६९, रवींद्र धंगेकर २४ हजार ६०४, मोहोळ पहिल्या फेरीनंतर ४ हजार ७६५ मतांनी आघाडीवर


उमेदवार पक्ष जय/पराजय
रवींद्र धंगेकर काँग्रेस
मुरलीधर मोहोळ भाजप
वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी

पुणे लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत भाजपचा उमेदवार तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात आत्मविश्वास असला, तरी काँग्रेसने शहरात तगडे आव्हान उभे केले होते. काँग्रेसला पु्ण्यातून आशेचे किरण दिसत होता, त्यामुळे राहुल गांधी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह डझनभर आमदार पुण्यात तळ ठोकून होते. याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत हेही प्रचारात उरतले होते.

भाजपकडून पुण्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. अजित पवार हे ‘बारामती’त व्यग्र असले तरी पण शेवटच्या चार दिवसांत त्यांनी पुण्याकडे आवर्जुन लक्ष दिले.

शहरात गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला मत द्या, या भूमिकेवर भाजपच्या प्रचाराचा भर होता; तर सर्वसामान्य व्यक्ती, मदतीला धावून जाणारा उमेदवार, केंद्र सरकारच्या योजनांवर टीका, बेरोजगारीचा मुद्दा यावर काँग्रेस जोर दिला. भाजपने मध्यमवर्गीयांना तर काँग्रेसने दलित-मुस्लिम; तसेच झोपडपट्टीवासीयांना समोर ठेवून प्रचाराची रणनीती आखल्याचे चित्र पुण्यातील प्रचारात दिसले. काँग्रेस आणि भाजप दोघांनाही पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागले. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी तर भाजपकडून फडणवीस यांनी बैठका घेऊन संबंधितांना कानपिचक्या दिल्या होत्या.

वंचित, ‘एमआयएम’चे आव्हान

पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे; तसेच ‘एमआयएम’कडून अनिस सुंडके रिंगणात होते. वसंत मोरे हेसुद्धा २०१७ला महापालिकेचे नगरसेवक होते; तर सुंडके स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. सुंडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १९९९ पासून कार्यरत होते. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासमवेत गेले; तर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केल्याचे ते सांगतात. लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला. त्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. अखेर वंचित बहुजन आघाडीने त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोरे आणि सुंडके यांचे किती मोठे आव्हान या निवडणुकीत उभे राहणार, ही उत्सुकतेची बाब ठरली.

‘मनसे’ची रसद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समन्वय साधला होता. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यात झाली. मनसेकडून महायुतीला मदत करण्याची भूमिका घेतल्याने भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना दिलासा मिळाला होता.

प्रचारातील कळीचे मुद्दे

महायुती
– पुण्याच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी
– नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी
– सांडपाणी शुद्धिकरण, नदीकाठ सुधारणा, पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ, मेट्रोचे जाळे, झोपडपट्टी पुनर्विकास
– वाहतूक कोंडी सोडविणे

महाविकास आघाडी
– महागाई, बेरोजगारी
– पुण्याचा विकास रखडला. प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार.
– पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प.
– मेट्रोचे मार्ग रखडले.

एकूण मतदान- २० लाख ५५ हजार ७४१
पुरुष- १० लाख ५५ हजार ६२
महिला- १० लाख ३५५
तृतीयपंथी – ३२४