‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चव्हाणांनी देशातील इंडिया आघाडीच्या परिस्थितीबद्दल भाष्य केले आहे. विविध राज्यांतून आढावा घेतल्यानंतरचा अंदाज वर्तवत चव्हाण म्हणाले, गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताचा आकडा गाठणेही अवघड झाल्याचे दिसते. देश आणि राज्यात भाजपाविरोधी वातावरण स्पष्ट दिसत आहे.
भाजपाविरोधातील वातावरणामुळे देशपातळीवर इंडिया आघाडीला चांगले यश मिळेल. इंडिया आघाडीला देशभरात साधारण २४० ते २६० जागा मिळतील. याउलट २०१९ च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील, असं दिसत नाही. ‘अबकी बार चारसो पार’ ही स्वत:चीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आल्याची टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान राज्यातील परिस्थितीनुसार चव्हाणांनी आघाडीच्या विजयी जागांबाबत अंदाज वर्तविला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचा घटक असलेल्या शिंदे गटाला तीन-चार जागा समाधान मानावे लागेल तर अजित पवार गटाला तर खातं खोलणंही कठीण असल्याचं दिसतं. काँग्रेसला १२ जागांवर यश मिळणार तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती असल्याने महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागांवर विजय मिळू शकतो.
भाजपाने २०४७ सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडली. मात्र, त्याविषयी भाजपाकडे स्पष्टता आणि कोणतेही ठोस धोरण नाही. तसेच निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार,संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहे. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपाला स्पष्टीकरण देता आलेले नाही. त्यामुळे भाजपाला लोकसभेत प्रभावी कामगिरी करता येणार नाही असेच चिन्ह आहेत, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.