दृष्टिहिनांना मुंबईत रोड क्रॉस करणं होणार सोपे; दिव्यांऐवजी आवाजाचे सिग्नल, कशी असेल यंत्रणा?

मुंबई : रस्ते ओलांडताना दृष्टिहीनांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: चौकांमध्ये सिग्नलचा रंग बदललेला आहे, हे समजू न शकल्याने त्यांच्या अपघातांचा धोका संभवतो. यावर उपाय म्हणून सिग्नलजवळ ‘बीपर’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या तीन ठिकाणी याची चाचणी सुरू आहे. तसेच ही यंत्रणा बसवण्यासाठी ३५० सिग्नलची निवड महापालिकेच्या वाहतूक विभागाने केली आहे. त्यामुळे दृष्टिहिनांना मुंबईतील रस्ते ओलांडणे सोपे होणार आहे.

मुंबईतील विविध जंक्शनवर मिळून ६५० सिग्नल आहेत. त्याचे अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जुन्या सिग्नलचा कालावधी निश्चित आहे. सिग्नल अद्ययावत मात्र स्वयंचालित पद्धतीने कालावधी ठरवला जातो. यामुळे वाहतूक नियोजन करणे सोपे होते. हे सिग्नल अद्ययावत करतानाच महापालिकेच्या वाहतूक विभागाने दृष्टिहिनांसाठी सिग्नल जवळ बीपर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सिग्नलजवळ नेमका रस्ता कधी ओलांडावा, हे अंध व्यक्तींना कळत नाही. त्यामुळे बीपर यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

बीपर यंत्रणा बसवण्यासाठी, ज्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी आणि रस्ते ओलांडले जातात अशा ३५० सिग्नलच्या ठिकाणी यादी महापालिकेने केली आहे. एखाद्या ठिकाणी सिग्नल हिरवा रंग दर्शवत असल्याचे दृष्टिहीनांना समजण्यासाठी एक वेगळा आवाजही यामध्ये जाणार आहे. या आवाजामुळे हिरवा असलेला सिग्नल लाल करून रस्ता ओलांडण्यासाठी दृष्टिहिनांना सिग्नलजवळ बसवलेले बीपरचे बटन दाबणे गरजेचे आहे. बटन असल्याचे स्पर्शज्ञानाने जाणीव व्हावी, यासाठी खांबावर बीपरचे बटण असलेली वेगळी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.

सर्वाधिक गर्दी आणि रस्ता ओलांडला जाणारे सिग्नल
पूनम चेंबर
रखांगी चौक
वरळीतील महापालिका अंध शाळा
प्लाझा जंक्शन
सासमीरा जंक्शन
व्हिला टेरेसा जंक्शन
मफतलाल जंक्शन
पोद्दार रुग्णालयाजवळ
केईएम रुग्णालयजवळच
नानावटी रुग्णालयजवळ
कूपर रुग्णालय जवळच
पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या काढा ‘पीएमपी’चे तिकीट, PMPच्या अ‍ॅपसह खासगी कंपन्यांची सेवा लवकरच
बटन दाबताच सिग्नल लाल रंग दर्शवेल आणि त्याचा वेगळा आवाज ऐकू जाईल. काही सेकंदांनी सिग्नल लाल होऊन वाहन थांबताच दृष्टिहीनांना रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे. सध्या माहीम जंक्शन चर्चजवळील सिग्नल, वरळी पूनम चेंबर आणि पोद्दार हॉस्पिटलजवळील सिग्नलवर ही यंत्रणा बसवून त्याची चाचणी केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चाचणी सुरू आहे. सिग्नल जवळच असलेल्या या यंत्रणेचा नेमका कालावधी किती असावा, यावर सध्या अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.