दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत?”
उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?
ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला, तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मतदान केलं, त्या सगळ्या जाती-धर्माच्या देशभक्तांना मी धन्यवाद देतो आहे, असे सांगत हिंदू, मुस्लिम, शीख ख्रिश्चन अशा सर्वधर्मीयांचा उल्लेख केला. काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही यूट्युबरनेही आमचा प्रचार केला. त्यावर मिंधे गटाने हा शहरी नक्षलवाद असल्याचा आमच्यावर आरोप केला. हुकूमशाही, तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो? लोकशाही वाचवणे, संविधान वाचवणे हा जर आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. मात्र, मोदी, शहा तर सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवतात. दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का? सत्तेचा दुरुपयोग करणे हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मला कसला स्ट्राइक रेट सांगता
ते म्हणाले, की, मिंद्यांना आणि भाजपला आव्हान देतो, की षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यबाण न लावता, शिवसेनेचे नाव न लावता लढून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचाही फोटो वापरला नाही. कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर वापरणारच नाही. माझ्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही मला कसला स्ट्राइक रेट सांगता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक झाली. तुम्ही पाच काय तर दहा टप्प्यांतही निवडणूक घेतली असती तर आम्ही रोज तुमची सालटी काढली असती. मी नम्र आहे; पण जर कोणी पाठीत वार करणार असेल तर आम्ही वाघनखे काढणार, असेही ते म्हणाले.
हे सरकार आपण पाडले पाहिजे
भाजपला तडाखा बसल्यानंतर आता ते विषयांतर करीत आहेत. मी पुन्हा एनडीएमध्ये जाणार, असे सांगत आहेत. आपल्याला मातेप्रमाणे असलेल्या शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत मी कधीच जाणार नाही, असे सांगत हे तुम्हाला तरी मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारताच गर्दीतून नाही नाही असे उत्तर आले. हे सरकार आपण पाडले पाहिजे, मध्यावधी निवडणूका लागणार असून, त्यानंतर आपण सत्तेवर येणार आहोत, असेही ते म्हणाले. भाजपचे २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांमधील फोटो पाहा. त्या वेळी त्यांच्यासोबत चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार नव्हते. मात्र, आता त्यांच्यासोबत भाजपने अनैसर्गिक युती केली आहे. हे कसले हिंदुत्ववादी आहेत? मोदी यांनी नायडूंचा निवडणुकीतील जाहीरनामा आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण करण्याचे सांगून टाकावे. नायडू आणि नितीशकुमार यांनी तिथल्या मुस्लिम मतदारांना जी आश्वासने दिली आहेत, ती मोदी पूर्ण करणार आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही काय आहोत ते या मुस्लिम समजाला माहिती आहे. आम्ही पाठीत वार करणारे नव्हे, तर समोरून वार करणारे आहोत, असेही ते म्हणाले.
मोदींचे पाय मातीचेच
विधान परिषदेची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. राज्यातील ४० आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार असताना ते मतदान कसे काय करू शकतात असा सवाल त्यांनी केला. आपण भाजप, तसेच भाजप मोदी अजिंक्य नाही हे जगाला दाखवले आहे. मोदींचे पाय मातीचेच आहेत हेदेखील दाखवले आहे. आता हार-जीत तर होत असतेच; पण मी हिंमत हरणार नाही आणि तुम्हालाही हिंमत हारू देणार नाही. काही ठिकाणी आपला जो पराभव झाला आहे, तो माझ्या जिव्हारी लागलाय आणि त्याचा वचपा मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
फडणवीसांवर टीका
भाजपने महाराष्ट्रात दिलेले नवीन प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मंत्री म्हणून नालायक आहेत. देशाच्या मंत्र्यांना पक्षाचे काम दिले जात असेल तर मग देशाचे काम कोण करणार, रेल्वेचे अपघात होणार नाही तर काय होणार, असा सवालही त्यांनी केला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांवर ‘जाऊद्याना घरी आता वाजवले की बारा’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची चंद्रपूरमध्ये नखे काढल्यावर आता ते लंडनला वाघनखे आणायला निघाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
राऊतही बरसले
या वेळी खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आता ब्रँड राहिला नसून त्यांची देशी ब्रॅण्डी झाली असल्याचा आरोप केला. ते ब्रँडीच्या नशेत आहेत. त्यांना देशाने नाकारले असतानाही ते धन्यवाद यात्रा काढत आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तिथे केवळ मोदी दिसत होते, श्रीरामाची मूर्ती दिसत नव्हती. आता जनतेची लाथ पडल्यावर मात्र मोदींना राम दिसला असेल, असा टोलाही हाणला.ही ते म्हणाले.