दादांमुळे भाजप डॅमेज? मुनगंटीवार म्हणतात, माकडास पुच्छ तीन हत्तीस दंत सहा; चक्रधरांचा उल्लेख

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीची झालेली सुमार कामगिरी, महाविकास आघाडीची घोडदौड, त्यानंतर महायुतीत सुरु झालेली सुंदोपसुंदी, संघाच्या मुखपत्रातून भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर झालेली टीका अशा घडामोडी सध्या सुरु आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनाझर’मधून करण्यात आली. त्यावर भाष्य करताना भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी चक्रधर स्वामींची गोष्ट सांगितली. ते महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मटा कॅफे’मध्ये बोलत होते.

‘चक्रधर स्वामींनी काही अंधांना हत्तीच्या रुपाबद्दल विचारलं. त्यावर प्रत्येकानं वेगवेगळं उत्तर दिलं. प्रत्येकाच्या हातात हत्तीचा जो अवयव आला, त्यानुसार कोणी लांब, कोणी उंच, कोणी गोल अशी उत्तरं दिली. निवडणूक विश्लेषणाचं असंच असतं. तुम्ही तुमच्या नजरेतून, अनुभवाच्या जोरावर निवडणूक निकालाचं विश्लेषण करत असता. आसपासचे लोक तुम्हाला जे फिडींग करतात, त्यावरुन तुम्ही निष्कर्ष काढत असता. हा निष्कर्ष कदाचित खरा असू शकतो. अंशत: खरा असू शकतो किंवा पूर्ण चुकीचा असू शकतो,’ अशा शब्दांत मुनगंटीवारांनी निवडणूक निकालाच्या विश्लेषणावर भाष्य केलं.
Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे आदित्य यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले तर…सुधीर मुनगंटीवार यांचं मिश्कील उत्तर
निकालाच्या विश्लेषणावर बोलताना त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. माकडास पुच्छ तीन, हत्तीस दंत सहा असं कोणी म्हटलं तर हा प्रकार कसा काय शक्य आहे असा प्रश्न पडू शकतो. पण एखाद्यानं त्याचं विश्लेषण केलं की माकडास पुच्छ, तीन हत्तीस सहा दंत. मग आता काय चुकलं? माकडास पुच्छ आणि तीन हत्तींना मिळून सहा दात हे खरंच आहे ना. त्यामुळे अनुभवी लोकांनी निकालाचं विश्लेषण करायचं असतं. भाजपची कोअर टीम निकालाचं विश्लेषण करेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीआधी भाजप अजित पवारांची साथ सोडेल आणि शिंदेसेनेसोबत निवडणूक लढवेल का, या चर्चेत तथ्य आहे का, असे प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर यात आज तरी काहीच तथ्य नाही. जागावाटपाची तारीख अद्याप तरी ठरलेली नाही. नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते. प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा ऑगस्टमध्ये जागावाटप होऊ शकतं. ते अधिक लवकर झाल्यास मग त्याचेही दुष्परिणाम दिसतील, असं मुनगंटीवारांनी सांगितलं.