दादांना ठाकरेंवर विश्वास, फडणवीसांचा वेगळाच कयास; २ उपमुख्यमंत्र्यांचे परस्परविरोधी अंदाज

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील. यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ठाकरेंबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाकरेंबद्दल दोन उपमुख्यमंत्र्यांनी अगदी परस्परविरोधी अंदाज वर्तवले आहेत.

तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेसमध्ये विलीन करणार का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर आमचा गट विलीन करणार असं मी म्हटलेलं नाही. आमची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे आम्ही आधीपासूनच सोबत आहोते. गांधी, नेहरुंच्या विचारसरणीनुसार आम्ही काम करतो. यापुढेही अधिक एकत्रितपणे ते काम करत राहू, असा विश्वास शरद पवारांनी बोलून दाखवला.
प्रश्न टाळले, काहीच न बोलता निघून गेले; अजितदादांच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचं मौन
शरद पवारांच्या विधानाबद्दल विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोलेबाजी केली. त्यांनी काय भूमिका घ्यावी, विलिनीकरण करावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण ती अशी संभ्रम निर्माण करणारी विधानं करत असतात, असा चिमटा दादांनी काढला. पण उद्धव ठाकरेंबद्दल अजित पवारांनी विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे असं काही करणार नाहीत, असं अजितदादा ठामपणे म्हणाले. मला नाही वाटत उद्धव ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम केलं आहे. मी अडीच वर्ष त्यांना जवळून पाहिलं आहे. त्यामुळे ते असं काही करतील मला अजिबात वाटत नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार विलिनीकरणाबद्दल ठाकरेंविषयी विश्वास व्यक्त करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळाच अंदाज वर्तवला. ‘अजितदादा उद्धव ठाकरेंना किती ओळखतात ते माहीत नाही. पण मी त्यांना चांगला ओळखून आहे. सध्या त्यांचे फिलोसॉफर आणि गाईड शरद पवार आहेत. त्यामुळे विलिनीकरणाबद्दल जे शरद पवार सांगतील तेच उद्धव ठाकरे करतील,’ असं फडणवीस म्हणाले.