पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, विशेषत: अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीनं पुण्यात कायम ताकद राखली आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत युती सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांनी बारामती, शिरुरच्या जागा लढवल्या. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. शरद पवारांच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाणी पाजलं. त्यामुळे अजित पवारांच्या वर्चस्वाला शह बसला. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी पराभूत झाल्या. त्यामुळे अजित पवारांना प्रचंड मोठा धक्का बसला.
आता भाजपनं अजित पवारांच्या पुण्यातील वर्चस्वाला आणखी धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येतंय. त्या माध्यमातून त्यांच्या मागे भाजप ताकद उभी करत असल्याची चर्चा पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दादांना बसलेल्या धक्क्यांमुळे पुण्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे अजित पवारांचं पालकमंत्री राहणार का, अशा चर्चा सुरु असताना मोहोळ यांची मंत्रिपदासाठी झालेली निवड राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आहे. विशेष म्हणजे मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा येतात. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं ११ जागा जिंकल्या, तर भाजपला ९ जागा मिळाल्या. सध्या पुण्यात भाजपचे ८ आमदार आहेत. आता मोहोळ यांच्यामागे केंद्रीय मंत्रिपदाची ताकद उभी करुन भाजपनं त्यांना बळ दिलं आहे. याचा वापर करुन जिल्ह्यातील भाजपचं सामर्थ्य वाढवण्याची कामगिरी त्यांना करुन दाखवावी लागेल. मोहोळ यशस्वी झाल्यास त्याचा फायदा भाजपला विधानसभेत होईल. भाजपचे आमदार अधिक निवडून आल्यास अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसेल. त्यांचं पालकमंत्रीपद धोक्यात येईल.