अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांना या भेटीसंबंधी विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणाले, की अतुल बेनके मला भेटले यात नवीन काय आहे?
लोकसभेला आमच्या उमेदवाराचं काम करणारे ‘आमचे’
शरद पवार पुढे म्हणाले, की अतुल बेनके हे सध्या कुठल्या पक्षात आहेत, ते मला माहिती नाही. पण आमच्या दोघांमध्ये कुठलीही राजकारणाच्या विषयावर चर्चा झालेली नाही, गत लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचे काम केले, ते आमचे, असं माझं मत आहे. पवारांच्या या वाक्यावर सगळेच खळखळून हसले.
माझ्या मित्राचा मुलगा
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, की अतुलचे वडील म्हणजेच वल्लभ शेठ बेनके हे माझे मित्र होते. म्हणजे अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. या भेटी राजकारण आणता कामा नये, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित दादांच्या बालेकिल्ल्यातच पक्षाला भगदाड
दरम्यान, दादा गटाला पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात भगदाड पडून अनेकांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा प्रकार ताजा असतानाच दादा गटातील विद्यमान आमदाराने शरद पवारांची घेतलेली भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.
अतुल बेनके कोण आहेत?
अतुल बेनके हे दिवंगत नेते वल्लभ शेठ बेनके यांचे सुपुत्र. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तळ्यात-मळ्यात झालेल्या बेनके यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.