शिवसैनिकांची नाराजी
डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेतून जनतेने सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून दिले. अमोल कोल्हे यांना खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ते आज मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
अमोल कोल्हे यांचा नियोजित जनता दरबार या नाराजीमुळे रद्द करण्यात आल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. जुन्नर,आंबेगाव, हडपसर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांचे जनता दरबार यशस्वीपणे पार पडले. त्यातच १८ जुलै रोजी अमोल कोल्हे हे भोसरी विधानसभेमध्ये जनता दरबार घेणार होते. मात्र, शरद पवारांच्या गटात अजित पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने हा जनता दरबार रद्द केल्याची चर्चा भोसरी विधानसभेमध्ये रंगली आहे.
शिवसेनेकडून अनेक निष्ठावंत इच्छुक
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेच्या जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्याकडून राज्यभर दौरे केले जात आहेत. त्यांच्या पक्षामध्ये अनेक नेते व पदाधिकारी जाहीर प्रवेश करत आहेत. भोसरी विधानसभेमध्ये शिवसेनेकडून अनेक निष्ठावंत इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिवसैनिकांकडून प्रयत्न केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार हडपसर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जनता दरबार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात १८ जुलै रोजी दोन ठिकाणी जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.