आणीबाणी लावली तेव्हा अमित शाह यांचे वय किती होते, त्यांना आणीबाणीविषयी काय माहितीये?
केंद्र सरकारतर्फे २५ जुलै दरवर्षी संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करताना त्यांनी वरील टीकास्त्र सोडले. यावेळी संजय राऊत म्हणाले की, भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानेच आणीबाणीला पाठिंबा दिला होता, असं सांगतानाच आणीबाणीबद्दल अमित शाह यांना काय माहिती आहे, तेव्हा त्यांचे वय तरी काय होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे समर्थन करताना घेतली होती. यावर अमित शाह आणि मोदी यांचे काय म्हणणे आहे ते सांगा, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मग हे कोण टिकोजीराव? लोकांनी त्यांना नाकारले
देशात सध्या अराजकता वाढली आहे. ही संविधानाची हत्याच आहे. मोदी आणि भाजपला बहुमत मिळाले नाही. याचे कारण ते संविधान बदलणार होते. संविधान बदलणार होते म्हणूनच त्यांना जनतेने नाकारले, असे त्यांनी यावेळी नमूद केले. तर आणीबाणीनंतर जनता पार्टीचे सरकार आले. जनता पार्टीला संविधानाची हत्या झाल्याचे वाटले नाही. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार आले, त्यांनाही संविधानाची हत्या झाली असे वाटले नाही. चंद्रशेखर पंतप्रधान बनले, त्यांना वाटले नाही संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिकोजीराव? त्यांच्याकडे बहुमत नाही. लोकांनी त्यांना नाकारले आहे. त्यांचे डोकं ठिकाण्यावर नाही, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.