दहाव्या मिनिटाला चिठ्ठी आली, शरद पोंक्षे नाराज, हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला आवडत नाही

मुंबई : शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर मेळाव्याचे आयोजन वरळी येथील एनएससीआय डोममध्ये करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील नेते-अभिनेते शरद पोंक्षे यांनी मंचावर जोरकस भाषण केलं. मात्र दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आल्याने पोंक्षेंचा हिरमोड झाला. “हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही…” अशा शब्दात शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय झालं?

शरद पोंक्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत होते. “आम्ही इतिहास विसरलो, इतिहासाची मढी कशाला उकरुन काढायची, पुढचं बघा.. पुढचं बघा.. पण पुढचं बघण्याच्या नादात आम्ही काय काय गमवलं? आम्ही अफगाणिस्तान गमवलं, पाकिस्तान गमवला, बांगलादेश गमवलं, म्यानमार गमवलं, नेपाळ गमवलं, चायनाचा काही भाग… (चिठ्ठी आली) किती वेळात संपवायचं? (चिठ्ठी वाचत) वेळ संपली… हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही… असं म्हणत शरद पोंक्षेंनी आपली नाराजी उघड केली.

हिंदू धर्म समजून घ्या मित्रांनो… (मागे वळून पाहत) माझ्यानंतर जे बोलणार आहेत… थोडासा वेळ आहे का? मी एवढं पूर्ण करतो.. कारण हा विषय कसा आहे ना.. (संजय शिरसाट यांच्याकडून चालू ठेवण्याची खूण)… पाच मिनिटात शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाही. सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी बोलू? बोलू ना? जास्त वेळ नाही घेणार.. फार नाही बोलणार… असं म्हणत शरद पोंक्षेंनी भाषण पुढे चालू ठेवलं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दरम्यान, आणखी दोन-चार मिनिटांत आपला मुद्दा मांडून झाल्यावर, शरद पोंक्षे म्हणाले की, खूप काही बोलायचं आहे, पण आता वेळ संपली अशी तिसऱ्यांदा चिठ्ठी आली. त्यामुळे मी थांबतो.. जय हिंद जय महाराष्ट्र.. तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. असं म्हणत साधारणे साडे पंधरा मिनिटांनी शरद पोंक्षे यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.