दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी, एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले, मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नीआमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपने दावा सांगितलेला होता. त्यादृष्टीने भाजपची चाचपणी देखील सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटाघाटीतील आक्रमकपणामुळे दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेने राखली आहे. शिवसेना ठाकरे गटाने तीन आठवड्यापूर्वीच दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर-मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण-मुंबई अशा १३ मतदारसंघांत येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या ३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे उर्वरित जागांवरील उमेदवार महायुतीकडून जाहीर होत आहेत. महायुतीकडून नाशिक, पालघर, कल्याण आणि ठाणे येथील उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.

शिवसेनेला जागा राखली, यामिनी जाधव यांना उमेदवारी

दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा दोघांनी दावा केला होता. भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक तयारीच्या सूचना केल्या आहेत. मात्र, शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नसल्याने अखेर त्यांना ही जागा देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेलाही जाधव यांच्याशिवाय तगडा उमेदवार मिळत नसल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

ठाण्यात कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबतही भाजप आणि शिवसेनेत निर्णय होताना दिसत नाही. ठाण्याची जागा शिवसेनेला सुटल्याची चर्चा असून, येथून मिनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांचे नावे आघाडीवर आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत यामिनी जाधव?

  • मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.
  • तसेच भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदारही आहेत
  • शिवसेना फुटीत त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
  • पती यशवंत जाधव यांच्यावरील आरोपामुळेच त्या शिंदे गटात गेल्याची टीका झाली