संबंधित तरुणाने केलेल्या थट्टा मस्करीमुळे नाराज झालेल्या जिम ट्रेनरने त्याच्या डोक्यात मुगदराने हल्ला केल्याची चर्चा आहे, मात्र हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धवल असे आरोपी जिम ट्रेनरचे नाव असून, विलास शिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे.
तरुणाच्या डोक्यावर मुगदर मारला
जिम ट्रेनरने सदस्याच्या डोक्यावर मुगदर मारला, त्यामुळे जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये एमआरआय स्कॅन करावे लागले. ही घटना बुधवार १७ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता घडली. मुंबईतील मुलुंड पूर्व भागातील फिटनेस इंटेलिजन्स जिममध्ये हा प्रकार झाला.
कवटीच्या डाव्या बाजूला दोन फ्रॅक्चर
एमआरआय स्कॅन अहवालात विलासला खोल जखमा झाल्याचे दिसत आहे. त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला दोन फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसते?
या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. विलास जिममध्ये उभा राहून इतरांशी बोलत असताना जिम ट्रेनरने त्याच्यावर हल्ला केला. हा प्रकार सर्वांना अनपेक्षित होता. थट्टामस्करीत केलेल्या विनोदामुळे जिम प्रशिक्षक नाराज झाला असावा, असा अंदाज आहे, मात्र हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मुगदर हे सोट्याप्रमाणे असलेले व्यायामाचे जड उपकरण आहे. कुस्तीपटू बहुतांश वेळा प्रशिक्षणासाठी ते वापरतात. डंबेलसारखे दिसणारे हे उपकरण पारंपरिक भारतीय व्यायामाचे साधन आहे. मुगदर वजनाने खूप जड असल्यामुळे बहुतेक कुस्तीपटू त्यांच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणाच्या दिवसांत एका हाताने धरु शकत नाहीत.