तो आमदार पक्षाचा निष्ठावान, क्रॉस व्होटिंग केले नाही, पाठराखण करणारे वडेट्टीवारांचे ट्विट

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालांत काँग्रेसची ५ ते ७ मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेस पक्षानेही अत्यंत आक्रमक पावले उचलून फुटीर आमदारांना पक्षबाहेरचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला आहे. निकालानंतर काँग्रेस आमदारांपैकी कोण फुटले? याची सर्वाधिक चर्चा रंगते आहे. मतदानापूर्वीच आमचे आमदार फुटतील असे सांगणाऱ्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावरच काहींनी संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत होती. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गोरंट्याल यांची पाठराखण करणारे ट्विट केले आहे.

विजय वडेट्टीवार यांचे ट्विट काय?

लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे.पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल.
MLC Election Results : आता कमिटी वगैरे काही नाही, गद्दारांना थेट बाहेरचा रस्ता, मते फुटल्यावर नाना पटोले प्रचंड संतापले!

कालच्या निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे.आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे.
MLC Election Results 2024: काँग्रेसचा पुन्हा गेम, मते फुटल्याची चर्चा, महायुतीचा विजयी झेंडा, मविआला धक्का!

काँग्रेसची मते फुटतील, याची आधीपासूनच चर्चा

काँग्रेस आमदार फुटतील, असे सुरुवातीपासून बोलले जात होते. आपल्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये त्यासाठी काँग्रेस पक्षाने डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासाठी २७ मतांचा कोटा निश्चित केला होता. उरलेली मते शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना देण्याचे पक्षाचे नियोजन होते. त्यामुळे डॉ. सातव पहिल्या फेरीतच विजयी झाल्या तर नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने दुसऱ्या पसंतीची मते घेऊन ते विजयी झाले.
पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर ५ वर्षांनी गुलाल पडला, राजकीय वनवास अखेर संपला!

अजितदादांचे परफेक्ट नियोजन

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची फुटीर आणि छोट्या पक्षांची मते मिळवून उभे केलेल्या पाचही उमेदवारांना यशस्वीपणे निवडून आणले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे ४० मते होती. अजित पवार गटानेही काँग्रेसची काही मते आणि अपक्षांच्या मदतीने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना निवडून आणले.

११ जागा-१२ उमेदवार, त्यामुळे मते फुटणार हे निश्चित होतेच!

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत काही मतांची फाटाफूट होईल, हे ठरलेले होतेच. भाजपकडून पाच, शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन असे एकूण ९ उमेदवार महायुतीकडून रिंगणात होते तर महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडून १, शिवसेना ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकाप नेते भाई जयंत पाटील असे एकूण ३ उमेदवार रिंगणात होते. ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने पडणारा उमेदवार कोणता, याची गेली १० दिवस जोरदार चर्चा झाली.