तोंड गोड करा… पंकजा मुंडेंनी विधानपरिषदेचा अर्ज भरला, चंद्रकांतदादांच्या ‘चॉकलेट’मय शुभेच्छा

मुंबई : आधी विधानसभा आणि मग लोकसभा अशा लागोपाठ दोन पराभवाच्या धनी ठरलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून पक्षाने अखेर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आले आहे. पंकजा मुंडेंनी आज विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना चॉकलेट भेट दिलं.

गेल्याच आठवड्यात विधिमंडळात आलेले माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी ठाकरेंना चॉकलेट दिलं होतं. आता पंकजांनाही चंद्रकांतदादांनी चॉकलेट भेट दिलं आहे.

भाजप नेत्यांची गर्दी

पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला, यावेळी आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन प्रसाद लाड, उमा खापरे, प्रीतम मुंडे, मोनिका राजळे, नमिता मुंदडा या भाजप नेत्यांसोबत पंकजांचे चुलत बंधू आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते.

पावणेपाच वर्षानंतर पुन्हा विधिमंडळात

दरम्यान, निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला राज्यसभा अथवा विधान परिषदेची उमेदवारी द्यायची नाही, या धोरणाला बगल देत भाजपने मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवळपास पावणेपाच वर्षानंतर पंकजा मुंडे पुन्हा विधिमंडळात दिसणार आहेत. मुंडे यांच्यासह विधान परिषदेसाठीच्या पाच उमेदवारांची यादी भाजपकडून सोमवारी जाहीर करण्यात आली.
Nashik Teachers Election : साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर गेले, दराडेंचा मुख्यमंत्री शिंदेंना फोन
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे ११ उमेदवार विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी नवी दिल्लीतून पक्षाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. मुंडे यांच्यासह माजी आमदार योगेश टिळेकर, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
Ambadas Danve-Prasad Lad : आई २५ वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली, अंबादास दानवेंचे शब्द मनाला लागले, रात्रभर झोप नाही, प्रसाद लाड भावूक

मुंडे समर्थकांमध्ये उत्साह

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. या पराभवाचा मुंडे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. या पराभवाचे पडसाद मुंडे समर्थकांमध्ये उमटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तसेच विधानसभेची निवडणूक भाजप महायुती म्हणून लढविणार असल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.