तुम्हाला बघून पुन्हा मागे आलो, चंद्रकांतदादा म्हणाले; राऊत म्हणतात, आपण एकत्र यायलाच पाहिजे

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये थट्टामस्करी रंगली. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान असल्यामुळे खासदार राऊतही ठाकरे गटातर्फे व्यवस्था पाहण्यासाठी विधिमंडळात आले होते.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची अचानक भेट झाली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, की मी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो. यावर संजय राऊत म्हणतात, आपण एकत्र यायलाच पाहिजे. त्यानंतर राऊत-पाटील यांच्यासह उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काँग्रेस आमदार भाई जगताप, संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्यासह काही आमदार-नेते मंडळी दिसत आहेत.

आपण पुन्हा एकत्र यायलाच पाहिजे

दरम्यान, “आपण पुन्हा एकत्र यायलाच पाहिजे” या संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, बरेच दिवस आम्ही चहासाठी एकत्र भेटलो नाही. त्यामुळे आपण पुन्हा चहा प्यायला एकत्र यायला पाहिजे, असं आपण म्हटल्याचं राऊत यांनी सांगितलं.
Sushma Andhare : विधान परिषदेत अजितदादांचा उमेदवार पडणार? सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितलं

ठाकरे-भाजप जवळीक वाढली?

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, जेव्हा उद्धव ठाकरे आले होते, तेव्हाही चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेत त्यांना ‘चॉकलेट’ दिलं होतं. त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र लिफ्ट प्रवासाच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही हलकाफुलका संवाद घडल्याचं दिसलं होतं.
Zeeshan Siddique : काँग्रेसच्या बैठकीला ‘दांडी’, आमदार गोरंट्याल यांना मिठी, झिशान म्हणतात, काल आलो नाही कारण…
एकीकडे, अखंड शिवसेना-भाजप यांच्या युतीत पडलेली फूट, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार, शिवसेनेत पडलेली फूट, शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या जवळीकीनंतर सत्ता स्थापन, शिंदेंकडे गेलेला पक्ष, यामुळे ठाकरे आणि भाजप यांच्यातील अंतर वाढलं होतं. केवळ राजकीय विरोधक नाही, तर शत्रुत्वाप्रमाणे त्यांचं वर्तन पाहायला मिळत होतं. मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन पक्षातील नेत्यांमध्ये कमी होणारं अंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारं आहे.