चांदिवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
महेंद्र भानुशाली यांची फेसबुक पोस्ट काय?
मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) भ्रष्टाचारी नालेसफाईमुळे माझा संपूर्ण साकीनाका-चांदिवली विभाग आज पहिल्याच मुसळधार पावसात पाण्याखाली गेला आणि जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारांची नालेसफाई झाली नसल्याचे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण चांदिवली विधानसभेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला वारंवार सांगत होतो, पण ऐकतील ते प्रशासन कसे? असं भानुशाली म्हणाले.
असंख्य कुटुंबं पाण्याखाली
त्याचाच दुष्परिणाम आज माझ्या साकीनाका आणि चांदिवली भागावर झाला असून असंख्य कुटुंबं पाण्याखाली बुडालेली आहेत. प्रशासन आणि सरकारला निवेदनाची भाषा कळत नाही, म्हणून आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत पाण्यामध्ये पोहण्याचे व सहलीचे प्रतिकात्मक आंदोलन घेतले, असंही भानुशाली यांनी सांगितले.
बघू सरकार आणि प्रशासन जागे होऊन संपूर्ण चांदीवली विधानसभेतील रस्त्याच्या बाजूचे गटार नालेसफाई करते का? अन्यथा चांदिवली मनसे यानंतर मनसे स्टाईलने मुंबई महापालिकेवर आंदोलन करेल हा शब्द आहे, असंही ते म्हणाले.
मुंबईकरांची दाणादाण
संपूर्ण जून महिना आणि जुलैचा पहिला आठवडा पावसाच्या प्रतीक्षेत घालवलेल्या मुंबईकरांची सोमवारी मात्र पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. अवघ्या काही तासांमध्ये कोसळलेल्या १५० ते २०० मिमी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी सखल भागात घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. गेल्या १० वर्षांमधील हा जुलैमधील सांताक्रूझ केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस होता.
२६८ मिलीमीटर पावसाची नोंद
मुंबईत रविवारी रात्रीनंतर सोमवार सकाळपर्यंत कुलाबा येथे १०० मिलीमीटरहून कमी पाऊस झाला, तर दिवसभरात याची कसर भरून काढत सोमवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत १०२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. सांताक्रूझ येथे सोमवारी सकाळपर्यंत २६८ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या १० वर्षांमधील हा जुलैमधील सांताक्रूझ केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस होता. याआधी सन २०१९मध्ये २४ तासांमध्ये ३७५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. रात्रभर पडलेल्या पावसानंतर दिवसभरात मात्र उपनगरात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे दिवसभरात केवळ १४ मिलीमीटर पावसाची नोंद सांताक्रूझ येथे झाली.