‘ती’ कार गिफ्ट दिलेली, आजोबांनी फोटो WhatsApp ग्रुपवर टाकलेला; मित्रानं गुपितं फोडली

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. दोन तरुण अभियंत्यांच्या दुचाकीला धडक देणारी, त्यांच्या मृत्यूस कारण ठरलेले पोर्शे कार अल्पवयीन आरोपीला त्याच्या आजोबांनी गिफ्ट म्हणून दिली होती. आरोपीचा आजोबा सुरेंद्र कुमार अगरवालचा मित्र अमन वाधवा यांनीच ही माहिती दिली आहे.

अमन वाधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अगरवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी एका लक्झरी कारचा फोटो व्हॉट्स ऍप ग्रुपवर शेअर केला होता. ही कार नातवाला वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याचा मेसेज अगरवाल यांनी ग्रुपमध्ये केला होता. एका कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून मी गेल्या ८ महिन्यांपासून अगरवाल यांना ओळखतो. अगरवाल यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. त्यावेळीही मी न्यायालयात उपस्थित होतो.
Pune Car Accident: पोर्शे अपघातानंतर संतापजनक रॅप साँग करणारा ‘तो’ तरुण कोण? ओळख उघड होताच माध्यमांना शिवीगाळ
सुरेंद्र अगरवाल यांच्या अटकेमागचं कारण काय?
पुणे पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक केली आहे. पुणे गुन्हे शाखेनं त्यांना २५ मे रोजी त्यांच्या घरातून अटक केली. २८ मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. चालक गंगाराम पुजारीला धमकावल्याचा आणि त्याच्यावर पोलिसांना जबाब देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. अपघातावेळी कार अल्पवयीन आरोपी नव्हे, तर मीच चालवत होतो, असा जबाब पोलिसांना देण्यासाठी पुजारी यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप सुरेंद्र अगरवालांवर आहे. चालक पुजारीला अगरवालला दोन दिवस डांबून ठेवण्यात आलं. त्याच्या पत्नी आणि नातेवाईकांनी त्याची सुटका केली.

अल्पवयीन आरोपी अपघातावेळी कार चालवत होता. पण अपघाताचा आळ चालक गंगाराम पुजारीवर टाकण्याचा प्रयत्न झाला. तसा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सुरेंद्र अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबंध असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कुटुंबातील मालमत्ता वादात त्यानं छोटा राजनची मदत घेतली होती. एका राजकीय नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या प्रकरणात सुरेंद्र अगरवाल, छोटा राजन यांची नावं समोर आली होती.