शहरात ‘आरटीओ’ची चार वायुवेग पथके आहेत. त्यांच्या मार्फत शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येईल. त्यानंतर मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे; तसेच विना नंबर प्लेट गाड्यांवरही कारवाई करावी, अशा सूचना पथकाला दिल्याची माहिती ‘आरटीओ’ संजीव भोर यांनी दिले.
कारची बाहेरील राज्यात तात्पुरती नोंदणी
‘कल्याणीनगर परिसरात अपघात झालेली कार ही बाहेरील राज्यात तात्पुरती नोंदणी करून आणलेली आहे. ती पुण्यात आल्यानंतर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती; पण त्यानंतर कारच्या मालकाने कोणताही कर भरला नाही; तसेच कागदपत्रेदेखील सादर केली नाही. त्यामुळे त्या गाडीला नंबर मिळाला नाही. गाडीला नंबर मिळत नाही तोपर्यंत ती रस्त्यावर आणता येत नाही, तरीदेखील ती कार रस्त्यावर आणण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मोटार वाहन कायद्याची कलमे लावली आहेत. यापुढे कारची नोंदणी करताना त्यांना दंड भरूनच नोंदणी करावी लागणार आहे,’ असे भोर यांनी सांगितले.
‘आरटीओ’च्या अहवालाची प्रतीक्षा
‘अपघात झालेल्या कारची ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. मात्र, त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर तो पोलिसांना सादर केला जाईल. त्यानंतरच त्या गाडीचा वेग किती होता हे स्पष्ट होणार आहे,’ अशी माहिती ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी दिली.