आता या आरोपांवर आमदार सुनील टिंगरे यांनी स्वत: यासर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपली उपस्थिती पोलिसांवर दबाव आणण्यासाठी नव्हती, असं त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. अपघातानंतर तासाभरात आरोपीच्या वडिलांचा फोन आला. यानंतर ते पोलिस ठाण्यात गेले. आपली उपस्थिती पोलिसांवर दबाव आणण्यासाठी नव्हती, असे टिंगरे यांनी स्पष्ट केलं. तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड पाहू शकता. आरोपींविरुद्धचा खटला कमकुवत करण्यासाठी मी कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा राजकारण्याला फोन केलेला नाही. माझे राजकीय विरोधक मला बदनाम करण्यासाठी खोटे बोलत आहेत, असा प्रत्यारोप त्यांनी केला आहे.
टिंगरे यांनी सांगितले की, रविवारी त्यांना आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाला पहाटे ३.२० वाजता अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा फोन आला. त्याने मला सांगितले की त्याच्या मुलाचा अपघात झाला आहे आणि जमाव त्याला मारहाण करत आहे. मी घटनास्थळी पोहोचलो, पण त्या मुलाला आधीच येरवडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तिथे पोचल्यावर पोलिस निरीक्षक हजर नसल्याचं समजलं. तासाभरानंतर ते आले. त्यांनी सांगितले की बाहेर मोठा जमाव जमला आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की मुलगा अपघातात सामील होता, ज्यामुळे दोघांचा जीव गेला आहे. त्यांनी मला प्रकरणाचे गांभीर्य सांगितल्यावर मी त्यांना कायद्यानुसार कारवाई करण्यास सांगितलं. निघताना टिंगरे यांची भेट मुलाचे वडील विशाल अगरवालशी झाली आणि त्यांनी त्याला अपघाताची माहिती दिली. मुलाच्या वडिलांनाही पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. सकाळी सहा वाजता ते तेथून निघाले असं, टिंगरे यांनी सांगितले.
टिंगरे यांनी मुलाला पिझ्झा आणि पाणी दिल्याचा आरोपही फेटाळून लावला आहे. मी त्या मुलाला भेटलो नाही, त्याच्याशी बोललोही नाही, असं त्यांनी सांगितलं. मी त्याला पिझ्झा कसा देऊ शकतो? टिंगरे म्हणाले की, पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. तोपर्यंत सगळं झालेलं होतं. या प्रकरणाला मी प्रभावित करण्यात प्रश्नच येत नाही, जर माझा तसा हेतू असता तर मी त्याला वाचवू शकलो असतो आणि त्याचं नावही बाहेर येऊ दिले नसतं, असंही टिंगरे म्हणाले.