तरुणाकडून पोलिसाच्या पायाची मालिश, कल्याणनगरमधील Video व्हायरल

प्रतिनिधी, येरवडा/पुणे : येरवडा वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक रात्रपाळीवर असताना कल्याणीनगर चौकात एका तरुणाकडून पाय दाबून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिस पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. ‘रात्रपाळीवर कर्तव्यावर असताना अचानक रक्तातील साखर वाढली आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे मी माझे पाय दाबत होतो. ते पाहून एका तरुणाने पाय दाबून देण्याची दर्शवली,’ असे स्पष्टीकरण संबंधित पोलिस अधिकाऱ्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री वाहनचालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी संबंधित उपनिरीक्षकाची रात्रपाळी होती. त्यांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करीत होते. दरम्यान, रात्री घरी परतणारा तरुण पोलिस अधिकाऱ्याचे पाय दाबत असल्याचे चित्रीकरण कारमधील एकाने केले. रविवारी दुपारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.
Pune RTO: ५२ वाहनचालकांचा सहा महिने परवाना निलंबित; ही एक चूक नडली, तुम्हीही असंच काहीसं करताय का?

संबंधित उपनिरीक्षकांशी संपर्क साधून व्हायरल व्हिडिओबाबत विचारणा केली. ‘शनिवारी रात्री कल्याणीनगर चौकात कामावर असताना अचानक चक्कर आली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपथावर खुर्चीवर बसून पाय दाबत होतो. तेवढ्यात रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने माझी विचारणा केली. रक्तातील साखर खूप वाढली असून, चक्कर येत आहे. त्यामुळे पाय दाबत बसलो असल्याची मी त्याला सांगितले. हे ऐकून तरुणाने मदतीच्या भावनेने माझे पाय दाबून दिले. मी कोणालाही जबरदस्तीने माझे पाय दाबण्यासाठी दबाव टाकला नाही,’ अशी प्रतिक्रिया या उपनिरीक्षकांनी दिली.
Pune Accident Case: अगरवाल कुटुंबाला कोण मदत करतेय? ससूनमधील दूरध्वनीचा होणार तपास

‘वस्तुस्थितीची पडताळणी सुरू’

‘संबंधित उपनिरीक्षक (वय ५७) येरवडा वाहतूक विभागात ॲडलॅब्स चौक, कल्याणीनगर येथे ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करीत होते. दोन दिवस रात्री आणि दिवसा ड्युटी केल्यामुळे त्यांची रक्तातील साखर ५५०पर्यंत वाढली. त्यामुळे त्यांच्या पायात गोळे आले आणि ते अचानक जमिनीवर बसले. व्हिडिओमधील तरुण त्यांची मदत करीत होता, तरीही आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करीत आहोत,’ असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

सलग दोन दिवस ड्युटी का?

या प्रकरणी स्पष्टीकरण देताना वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार यांनी संबंधित उपनिरीक्षक सलग दोन दिवस ड्युटी करून, रात्रपाळीला कर्तव्य बजावत होते, असे नमूद केले. त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ५७ वर्षीय उपनिरीक्षकाला सलग दोन दिवस ड्युटी का लावण्यात आली, पोलिस प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.