ठाणे-CSMT लोकल अखेर रवाना, मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मात्र २०-२५ मिनिटं उशिराने

मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. कारण मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन पावसामुळे विस्कळीत झाली. परिणामी दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र साडेसात वाजल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे.

मध्य रेल्वेवरील भांडुप-विक्रोळी, तर हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल, वडाळा, टिळक नगर यासारख्या सखल भागात पावसामुळे पाणी साचून लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे ठाणे, गोरेगाव, मानखुर्द पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सकाळी सहा वाजता ठप्प झाली होती. आठ वाजल्यानंतर लोकल पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली, मात्र ती २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहे.

दादरला तुडुंब गर्दी

दादर रेल्वे स्थानकांवर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत असते. लोकल फलाटावर शिरायच्या आधीच त्यात उडी मारुन मोक्याची जागा पकडणारे प्रवासी दिसत असतात. मात्र आज या गर्दीत वाढ झाली. सकाळी सातच्या सुमारासच प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

पुण्याला जाणाऱ्या ट्रेन रद्द

दुसरीकडे, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचाही खोळंबा झाला आहे. कारण सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

दादरला वाहतूक कोंडी

विशेष म्हणजे दादर स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळाला. स्टेशनबाहेरील स्वामीनारायण मंदिर परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे काही काळ ट्राफिक जाम झाला होता.

मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पाणी साचले होते, आंबेडकर मार्गही जलमय झाला होता, परंतु सध्या ठाणे शहरात पावसाचा वेग कमी असून विविध ठिकाणी साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम न होऊन ठाणेकरांची रस्ते वाहतूक आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरळीत पार पडणार असल्याचे चित्र आहे

महापालिका शाळांना सुट्टी

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शाळांना सकाळच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे पाणी साचल्यानंतर प्रशासनाने बीएमसीच्या शाळांना सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतला.