भाजपने गुरुवारी रात्री उशिरा पालघर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यानंतर आता राज्यातील लोकसभेच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. देशात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार असली तरी राज्यात मात्र भाजपची सर्वाधिक १५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसविरोधात लढाई होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक सहा जागा ते विदर्भात काँग्रेसविरोधात लढवत आहेत. काँग्रेसच्या खालोखाल भाजप आठ मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांविरोधात लढणार आहे.
शिवसेना (शिंदे गट) लढवत असलेल्या १५ पैकी १३ जागांवर त्यांची लढत ठाकरे गटाच्या उमेदवारांबरोबर होईल. उद्धव ठाकरे यांचा भाजपच्या विरोधात कितीही राग असला तरीही ते प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला आलेल्या या २१ मतदारसंघापैकी केवळ उत्तर पूर्व मुंबई, पालघर, सांगली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या पाच मतदारसंघांतच भाजपला आव्हान देणार आहेत.
शिंदे गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यात एकाही मतदारसंघात लढत होणार नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि अजित पवार गटदेखील निवडणुकीत कोठेही समोरासमोर नाहीत. शरद पवार यांची ‘राष्ट्रवादी’ केवळ बारामती आणि शिरूर मतदारसंघांत अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’विरोधात लढणार आहे. शिंदे यांची शिवसेना कोल्हापूर आणि रामटेक या मतदारसंघांत काँग्रेसविरोधात उभी ठाकली आहे.
१५ आमदार लोकसभेच्या रिंगणात
या वेळी चौदाव्या विधानसभेतील सर्वपक्षीय १४ आणि विधान परिषदेचा एक असे एकूण १५ आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील चार आमदार खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत. त्यात शिंदे गटाचे दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईतून अनुक्रमे यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांचा, ईशान्य मुंबईतून मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा, तर उत्तर मध्य मुंबईतून धारावीच्या काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. शिंदे गटाने रामटेकमधून काँग्रेसचे आमदार राजू पारवे, औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने चंद्रपूरमधून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना, सोलापूरमधून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने सर्वाधिक आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. त्यात नागपूरमधून विकास ठाकरे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगरमधून नीलेश लंके यांना, तर विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील हेही निवडणूक लढवत आहेत.
राज्यातील लढतीचे चित्र
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट (१३ मतदारसंघ)
दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, मावळ, नाशिक, शिर्डी, हातकणंगले, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा आणि औरंगाबाद
काँग्रेस विरुद्ध भाजप (१५ मतदारसंघ)
उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पुणे, सोलापूर, धुळे, नंदुरबार, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली चिमूर, अकोला, अमरावती, लातूर, जालना आणि नांदेड
शरद पवार राष्ट्रवादी गट विरुद्ध भाजप (८ मतदासंघ)
बीड, वर्धा, माढा, सातारा, अहमदनगर, दिंडोरी, भिवंडी, रावेर
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
४८ पैकी प्रामुख्याने ८ मतदारसंघात तिरंगी लढती
– रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचित बहूजन आघाडीचे किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
– अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे, प्रहार पक्षाचे दिनेश बुब यांच्यात लढत होत आहे.
– अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
– सांगलीमध्ये भाजपचे संजककाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंड केलेले अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होत आहे.
– हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर आणि स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी याच्यात लढत होत आहे.
– संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि एमआयएमकडून इम्तियाज जलील हे लढत आहेत.
– पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे याच्यात लढत होत आहे.