ठाकरे बंधूंच्या युतीची तुफान चर्चा, तिकडे शिंदे गटाने विषयच संपवला; थेट भविष्य सांगून टाकलं!

Raj Thackeray And Uddhav Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या शक्यतेवर भाष्य केलंय. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आमच्यातील भांडणं छोटी आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र आहे, असं म्हणत त्यांनी भविष्यात मनसे आणि ठाकरे गटात युती होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. राज ठाकरेंच्या याच विधानानंतर उद्धव ठाकरेंनीदेखील सकारात्मकता दाखवली आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या याच संभाव्य एकत्रीकरणावर शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये युती होण्याची शक्यता कमी आहे. हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकत नाहीत, अशा आशयाचं मत शिंदेंच्या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी नवी भूमिका घेतलेली नाही. यापूर्वीदेखील त्यांनी अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही. त्यावेळच्या प्रस्तावाचं जे झालं होतं तोच अनुभव आताही त्यांना येईल, असं मला वाटतं. पक्ष चालवताना, संघटन चालवताना जो संयम लागतो, निर्णय घेण्यासाठी धाडस असावं लागतं ते राज ठाकरे यांच्याकडे आहे. पण राज ठाकरेंसोबत युतीत गेल्याने काय होईल त्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या संघटनेत इंतरानी येणं उचित वाटत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे,” असे मत शिरसाट यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीसोबत काय झालं? त्यांनी युती केली पण त्यांचं शरद पवार यांच्यासोबत जमलं नाही. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेससोबतही जमलं नाही. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचं जमणार नाही कारण राज ठाकरे यांना अंतर्गत गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करायला तयार होणार नाहीत, असेही भाकित शिरसाट यांनी व्यक्त केलं.

राज्य ठाकरे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न -उदय सामंत

“मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत पाहिली. पण राज ठाकरे यांनी युतीसाठी टाळी मागितली असा अर्थ का लावला जात आहे, हे मला माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात राज ठाकरे यांना कमी लेखणारी आहे. राज ठाकरे यांचं नेतृत्त्व हे मनसेने महाराष्ट्रातील जनतेनं मान्य केलेलं आहे. ते त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे चावलात. अट टाकून बरोबर घेणं एवढं राज ठाकरे यांचं नेतृत्त्व छोटं नाही. त्यामुळे राज ठाकरेंना कमी लेखण्यासाठीच ती अट टाकलेली आहे,” असा अर्थ उदय सामंत यांनी काढला आहे.

युती होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार नाही, असे मत शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी आम्ही राज ठाकरेंच्या विधानाकडे सकारात्मकतेने पाहतोय, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)